Will Ambedkar play Muslim or Maratha card in Balapur assembly election? | Sarkarnama

बाळापूर विधानसभेसाठी भारिप-बमसं मुस्लीम की मराठा कार्ड खेळणार? 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 29 डिसेंबर 2018

बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांना बुलडाणा लोकसभेची उमेदवारी जाहीर करून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच राजकीय पक्षांना जोरदार धक्कातंत्र दिले आहे. आमदार सिरस्कार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने बाळापुर विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ मुस्लीम किंवा मराठा कार्ड खेळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

अकोला : बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांना बुलडाणा लोकसभेची उमेदवारी जाहीर करून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच राजकीय पक्षांना जोरदार धक्कातंत्र दिले आहे. आमदार सिरस्कार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने बाळापुर विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ मुस्लीम किंवा मराठा कार्ड खेळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीत वंचीत बहुजन आघाडी सहभागी होण्याची शक्‍यता आता धुसर झाली आहे. वंचीत बहुजन आघाडीने एमआयएमशी हातमिळवणी करीत मुस्लीम, धनगर, माळी, ओबीसी समाजाची मोट बांधणे सुरू केले आहे. 

पश्‍चिम विदर्भात माळी समाजाचे प्राबल्य पाहता आंबेडकर यांनी माळी समाजाचे असलेले आमदार बळीराम सिरस्कार यांची बुलडाणा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करून सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला आहे. आमदार सिरस्कार हे बाळापुर विधानसभेचे नेतृत्व करीत आहेत. त्यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याने बाळापुर विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भारिप-बमसंचा उमेदवार कोण असेल यावर खलबते सुरू झाले आहेत.

भारिप बहुजन महासंघात मराठा समाजाचे युवा नेतृत्व म्हणुन प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे पाहिल्या जाते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये प्रा. पुंडकर यांना उमेदवारीची संधी हुकली. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारिपने त्यांना एबी फॉर्म सुद्धा दिला होता. 

मात्र, पक्षाने ऐनवेळी विद्यमान आमदार सिरस्कार यांनाच संधी दिल्याने प्रा. पुंडकर यांनी माघार घेतली. दोन वेळा संधी हुकल्यानंतरही पुंडकर हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची दावेदारी प्रबळ समजल्या जात आहे. मराठा समाजाप्रमाणेच या मतदारसंघात मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ मुस्लीम उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारिप-बमसं कोणत्या समाजाचे कार्ड वापरणार? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

संबंधित लेख