Will Amal Mahadik join campaign against his brother | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

'युती धर्म कि बंधू प्रेम' : युतीच्या व्यासपीठावर अमल महाडीक जाणार ? 

निवास चौगले 
गुरुवार, 14 मार्च 2019

लोकसभा निवडणुकीतील भाजपा-सेना युतीचा राज्याचा प्रचार शुभारंभ 24 मार्च रोजी कोल्हापुरात होत असून या प्रचाराच्या व्यासपीठावर भाजपाचे आमदार अमल महाडीक, त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक हे जाणार का ? असा प्रश्‍न राजकीय क्षेत्राला पडला आहे. 

कोल्हापूर :  लोकसभा निवडणुकीतील भाजपा-सेना युतीचा राज्याचा प्रचार शुभारंभ 24 मार्च रोजी कोल्हापुरात होत असून या प्रचाराच्या व्यासपीठावर भाजपाचे आमदार अमल महाडीक, त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक हे जाणार का ? असा प्रश्‍न राजकीय क्षेत्राला पडला आहे. 

या निवडणुकीत आमदार महाडीक यांचे चूलत बंधू खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. आजच त्यांची पक्षाकडून उमेदवारीह जाहीर झाली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 20-22 दिवसांत श्री. महाडीक आमदार झाले आहेत. गेली साडेचार वर्षे ते भाजपाशी एकनिष्ठ आहेत. विधानसभेनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पत्नी सौ. शौमिका यांनाही भाजपाच्या तिकिटावर शिरोली गटातून निवडून आणले. 

ज्या पदाने त्यांना हुलकावणी दिली होती ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदही सौ. महाडीक यांना मिळवून देताना त्यांच्यासह त्यांचे वडील माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपाची सत्ताही आणली. 

आता लोकसभा निवडणुकीत मात्र आमदार महाडीक यांच्यासमोर 'युती धर्म कि बंधू प्रेम' असे धर्मसंकट आहे . पण गेल्या काही दिवसांपासून आ. महाडीक यांच्या पत्नी सौ. शौमिका यांनी खासदार महाडीक यांचा प्रचार सुरू केला. रामकृष्ण हॉलमध्ये येथे झालेल्या महिला मेळाव्यात खा. महाडीक यांच्या पाठीशी रहाण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे आमदार महाडीक यांनीही खा. महाडीक यांच्या प्रचारार्थ येवती (ता. करवीर) येथे आयोजित मेळाव्यात शेवटच्या क्षणी हजेरी लावून आपली भुमिका काहीअंशी का होईना स्पष्ट केली आहे. 

या पार्श्‍वभुमीवर युतीच्या प्रचार शुभारंभाच्या सभेत महाडीक दाम्पत्य उपस्थित रहाणार का याविषयी उत्सुकता आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे प्रचारात राहू दे निदान सभेला तरी उपस्थित रहावे लागेल. प्रत्यक्षात काय होणार यासाठी 24 मार्चची प्रतिक्षा करावी लागेल. 
 

संबंधित लेख