मोहिते-पाटलांनी 'सीमारेषा' का ओलांडली?

विजयसिंह मोहिते-पाटील हे आक्रमक, अंगावर धावून येणारे किंवा बोलभांड नेते नव्हेत. ते संयमी, शक्य तितकं जमवून घेऊ पाहणारे आणि सीमारेषेच्या आत खेळणारे राजकारणी. सीमा ओलांडायला हवी आणि हीच वेळ आहे, याची जाणीव मोहिते-पाटलांना झाली आहे, हे इतकेच.
मोहिते-पाटलांनी 'सीमारेषा' का ओलांडली?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी राज्यसभा सदस्य आणि मोहिते-पाटील गटाचे तरूण नेतृत्व रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा पक्षाला रामराम ही काही अचानक, एका रात्रीत घडलेली घटना नाही. एकीकडे शरद पवारांचा नातू खासदारकीला उभा राहतोय आणि दुसरीकडं आपला मुलगा रणजितसिंह आणि आपल्या गटाचे सोलापूर जिल्ह्यातले राजकारण टप्प्याटप्प्याने आक्रसत चाललेय, याची पंच्च्याहत्तरीतल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना बोच असणारच. 

सीमारेषेच्या आतले राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासूनच्या 20 वर्षांत वारंवार दिलेले मौन इशारे मोहिते-पाटील यांनी अखेर मुलाच्या माध्यमातून कृतीत आणले आहेत. ते आणतानाही नेमकेपणाबाबत मात्र त्यांनी मौनच ठेवले. रणजितसिंह यांच्या भाजपप्रवेशाच्या निर्णयाशी 'सहमत' आहोत, यापलिकडं किमान आजतरी ते काही बोलले नाहीत. मुळात मोहिते-पाटील आक्रमक, अंगावर धावून येणारे किंवा बोलभांड नेते नव्हेत. ते संयमी, शक्य तितकं जमवून घेऊन पाहणारे आणि सीमारेषेच्या आत खेळणारे राजकारणी. सीमा ओलांडायला हवी आणि हीच वेळ आहे, अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोहिते-पाटलांवर आली आहे, हे रणजितसिंह यांच्या भाजपप्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उघड होत आहेत, इतकेच. 

वसंतदादांच्या गटाचे नेते

वीस वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोहिते-पाटील यांचे दोन टप्पे आहेत. प्रत्येकी दहा वर्षांचे. पहिल्या टप्प्यात स्वतःसाठीचा संघर्ष आणि नंतरच्या दहा वर्षांत गटासाठीचा संघर्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जी मंडळी शरद पवारांसोबत आली, त्यामध्ये सर्वात उशीरा विजयसिंह मोहिते-पाटील दाखल झाले. ही घटना 1999 ची. कोल्हापूरचे कल्लाप्पा आवाडे येतो येतो म्हणत काँग्रेसमध्येच राहिले. तसेच मोहिते-पाटीलही काँग्रेसमध्येच राहतील, अशी शक्यता असताना ते राष्ट्रवादीत आले. पवारांच्या राजकारणाच्यादृष्टीने त्यांचा प्रवेश महत्वाचा होता. मोहिते-पाटील हे परंपरागत वसंतदादा पाटील गटाचे नेते. वसंतदादांच्या निधनानंतर दहा वर्षांनी स्थापन झालेल्या राष्ट्रवादीत त्यांनी दाखल होणे तत्कालीन राजकारणातील महत्वाची घटना होती. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर मोहिते-पाटील यांच्याकडे मंत्रीपदं आली; मात्र ज्येष्ठत्वात क्रमांक दोनचे पद काही आले नाही. राज्यात 1999 मध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात अखेरच्या टप्प्यात छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागल्यानंतर मोहिते-पाटील त्या पदावर आले. उणीपुरी दीड वर्षे ते पदावर राहिले आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने राष्ट्रवादीत दु्य्यम भूमिकेत फेकले जात राहिले. पुढच्या म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ बदलल्यावर तर ते पराभूत झाले. त्याचवर्षी लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांच्या जिल्ह्यातून माढ्यातून पवार मात्र निवडून आले. 

पुढची दहा वर्षे संघर्षाची

याचे परिणाम पुढचे दहा वर्षे दिसत राहिले. एकीकडे मोहिते-पाटील यांच्या एकछत्री अंमलाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शह द्यायला सुरूवात केली आणि दुसरीकडे मोहिते-पाटील गट शाबूत राहावा, असा संघर्ष सुरू झाला. 2011 मध्ये मोहिते-पाटील विधान परिषदेवर निवडून आले खरे; मात्र मोहिते-पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे स्थानिक राजकारण लढाईची ही पहिलीच फेरी होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही माढ्यातून मोहिते-पाटील निवडून आले. तो पवारांचा करिष्मा मानला गेला. मोहिते-पाटील यांना त्यांच्याच जिल्ह्यात स्वतःच्या विजयाचे श्रेयही मिळाले नाही. गेले वर्षभर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना माढा मतदारसंघात माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव चर्चेत येत राहिले. खुद्द पवार त्यांच्या स्टेजवरही दिसले. 

पक्षांतराचा उपाय

या साऱयातून मोहिते-पाटील गट विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष पेटत राहिला. रणजितसिंह मोहिते-पाटील राज्यसभेवर गेले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. मात्र, विधान परिषद-राज्यसभा आणि विधानसभा-लोकसभा यातल्या राजकारणाचा फरक आणि प्रभाव मोहिते-पाटील घराण्याला चांगलाच माहिती आहे. त्यामुळे, राज्यसभेवर जाऊन मोहिते-पाटलांनी समाधान मानले नाही. त्यांना लोकसभेचीच जागा लढवायला स्वतःच्या हातात हवी होती. उमेदवारीच्या याद्यांमागून याद्या जाहीर होत असतानाही माढा लटकलेलेच राहिल्याने अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी थेट पक्षांतर जाहीर करून टाकले. आता सिनिअर मोहिते पाटील मुलासोबत थेट पवारविरोधी कॅंपमध्ये जाणार की आपल्या गोड हास्यातून अर्थ शोधायचे काम इतरांवर सोपविणार, याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com