Why Manikrao Kokate is restless in BJP ? | Sarkarnama

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माणिकराव कोकाटे का अस्वस्थ आहेत ? 

संपत देवगिरे :  सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

माणिकराव कोकाटे यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे पण भाजपमधून अजून त्यांना ग्रीन सिग्नल मिळालेला नाही .

नाशिक : पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे सध्या अस्वस्थ भाजपमध्ये अस्वस्थ आहेत . मूळचे नारायण राणे गटाचे मानले गेलेले माणिकराव कोकाटे यांना शिवसेना -भाजप युती झाल्यास आपले भवितव्य काय ही चिंता असावी असे राजकीय वर्तुळात बोलले जाते . 

माणिकराव कोकाटे यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे पण भाजपमधून अजून त्यांना ग्रीन सिग्नल मिळालेला नाही . त्यामुळे ते विविध निमित्तांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील आपल्या जुन्या स्नेहबंधांना उजाळा देत आहेत . 

सिन्नर मतदारसंघात गत चार दशकांपासून राजकीय पक्ष दुय्यम तर दोन गटांभोवती राजकारण चालते. सध्या शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि भाजपचे माणिकराव कोकाटे यांचे गट परस्पर विरोधात कार्यरत आहेत. मात्र या दोन्ही पक्ष एकमेकांचे सहकारी असल्याने श्री. कोकाटे यांचे राजकारण अनिश्‍चित आहे. 

शिवसेना, भाजपची युती झाल्यास लोकसभा, विधानसभा या दोन्ही जागांवर शिवसेनेचे प्रतिनिधी असल्याने श्री. कोकाटेंचे राजकारण अनिश्‍चित होईल. 

त्यांची सततची पक्षांतरे आणि बेधडक वक्तव्ये, कार्यशैलीने त्यांनी दोन्ही कॉंग्रेसमधील भुजबळ, थोरात, पिचड, श्रीमती निलीमाताई पवार यांपासून सगळ्यांना दुखावले आहे. त्यांच्या उमेदवारीत तो सर्वात मोठा अडसर आहे. त्यामुळे त्यांनी भाजप विरोधकांशी राजकीय पॅचअप म्हणुन पाणी परिषदेचा चाणाक्षपणे वापर करुन घेतला. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी हा ब्लाईंड डाव आहे असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे . यामध्ये नाशिक मतदारसंघातील राजकारणात तरंग उमटले आहेत.    

 नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी भाजपचे माणिकराव कोकाटेंची प्रबळ इच्छा आहे. उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षाचे त्यांना वावडे नाही. 

त्यांच्या पाणी परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसह भाजप विरोधकांनी हजेरी लावली. त्यामुळे या कार्यक्रमातुन त्यांनी राजकीय पॅचअप केले की लोकसभेच्या उमेदवारीसाठी 'ब्लाईंड' डाव टाकला ही चर्चा रंगली आहे. 

श्री. कोकाटे यांचे समर्थक बंडुनाना भाबड यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने सिन्नरला पाणी परिषद झाली. या परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री भुजबळ, विरोधी पक्षनेते मुंढे, ऍड भगीरथ शिंदे, माजी खासदार देवीदास पिंगळे, जयंत जाधव, भारती पवार, स्थानिक विरोधक तुकाराम दिघोळे, कोंडाजी मामा आव्हाड, कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांसह भाजप विरोधकांची मांदीयाळी व्यासपीठावर होती.

या नेत्यांनी आपल्या भाषणातही भाजप विरोधी राग आळवला. यावेळी भाजपचा कोणीही प्रमुख नेता नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमाला राजकीय कंगोरे निर्माण झाले आहेत. 

संबंधित लेख