Why Ghanashyam Shelar's Candidature not Declared by Uddhav Thakray | Sarkarnama

घनःश्याम शेलारांचं चुकलं की भाजपशी युतीचं घोडं अडलं....

मुरलीधर कराळे
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

नगरमधील आजचा शिवसेनेचा मेळावा म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांनी दाखविलेली ताकद होती. केलेले शक्तीप्रदर्शन होते. लोकसभेसाठी शेलार यांच्याबरोबरच पारनेरचे आमदार विजय औटी, नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या नावाची चर्चा होत असली, तरी राठोड यांना विधानसभेचीच उमेदवारी हवी आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली आहे. आमदार औटी यांची पारनेरमधील 'व्होटबॅंक' त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तसेच त्यांनाही लोकसभेपेक्षा विधानसभेचेच जास्त महत्त्व वाटते. या पार्श्वभूमीवर शेलार यांचेच नाव पुढे येत आहे.

नगर : लोकसभेचे राज्यपातळीवरील रणशिंग फुंकताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील पहिल्याच सभेत लोकसभेचा उमेदवार जाहीर करून मैदानात उतरल्याचे जाहीर केले. पण नगर दक्षिणेच्या जागेबाबत मात्र उल्लेख केला नाही. लोकसभेच्या या मतदारसंघात उमेदवारीसाठी श्रीगोंद्यातील नेते घनश्याम शेलार गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या इतर नेत्यांनी उमेदवारीचे संकेतही दिले होते. आज घोषणा होणेच बाकी होते, असे असताना ठाकरे यांनी ब्र शब्दही काढला नाही. भाजप-शिवसेना युतीमध्ये ही जागा भाजपकडे असते. ज्या अर्थी शिवसेनेच्या उमेदवारीची घोषणा केली नाही, त्या अर्थी राज्यपातळीवर भाजप – शिवसेनेचे युती होऊ शकते, अशी अशी भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची झाली आहे.

नगरमधील आजचा शिवसेनेचा मेळावा म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांनी दाखविलेली ताकद होती. केलेले शक्तीप्रदर्शन होते. लोकसभेसाठी शेलार यांच्याबरोबरच पारनेरचे आमदार विजय औटी, नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांच्या नावाची चर्चा होत असली, तरी राठोड यांना विधानसभेचीच उमेदवारी हवी आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली आहे. आमदार औटी यांची पारनेरमधील 'व्होटबॅंक' त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तसेच त्यांनाही लोकसभेपेक्षा विधानसभेचेच जास्त महत्त्व वाटते. या पार्श्वभूमीवर शेलार यांचेच नाव पुढे येत आहे.

यापूर्वी नगर जिल्ह्यात झालेल्या विविध कार्यक्रमात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शेलार यांना भावी उमेदवार असे म्हटले होते. त्यामुळे भाजप व शिवसेनेची युती झाली नाही तर शेलार यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित मानली जाते. युती झाली, तर मात्र शेलार यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार आहेत. कारण ही जागा भाजपकडे जाईल. भाजप – शिवसेना युतीचे संकेत नसते तर किंवा कोणत्याही परिस्थितीत युती होणार नसेल तर ठाकरे यांनी नगर दक्षिणेचा उमेदवार जाहीर केला असता. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळेच घनश्याम शेलार यांचं काही चुकलं, की केवळ युतीमुळं त्यांचं घोडं अडलं, याबाबत मात्र नेतेही तोंडावर बोट ठेवत आहेत.

तर शेलारांना पुन्हा धक्का
यापूर्वी घनःश्याम शेलार भाजपमध्ये होते. १९९९ च्या निवडणुकीत त्यांची नगर दक्षिणमधून लोकसभेसाठी उमेदवारीही निश्चित झाली होती. त्यांचे गावागावात सत्कारही सुरू झाले. पण ऐनवेळी दिलीप गांधी यांना उमेदवारी मिळून ते खासदार झाले. त्यामुळे शेलार नाराज झाले. त्यांना त्या वेळी बसलेला धक्का ते आजही विसरलेले नाहीत. नंतरच्या काळात त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या गोटात ते जास्त दिवस रमले नाहीत. अखेर त्यांनी शिवसेनेचे धनुष्य हाती धरले. 

गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी मतदारसंघातील गावे पिंजून काढली. एकच ध्यास, तो म्हणजे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करायचा. आता ती संधी चालून आली होती. आजच्या मेळाव्यात उमेदवारी जाहीर होईल, याच अविर्भावात त्यांनी तयारी केली होती. त्यांच्या भाषणाला टाळ्यांचा कडकडाटही झाला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवर युती झाल्यास आणि शेलार यांची उमेदवारी पुन्हा हुकेल. त्यामुळे त्यांना दुसरा मोठा धक्का बसेल, अशी भिती त्यांच्या गोटातून व्यक्त होत आहे.

2019 मध्ये सत्तेचा सारीपाट कोण जिंकणार? - जाणून घ्या सरकारनामा दिवाळी अंकातून...अंक सवलतीच्या दरात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख