ध्यानधारणा करणाऱ्या आमदार चाबूकस्वारांना राग का आला?

गेल्या वर्षी पूलावर वाढदिवस साजरा करणाऱया आमदारांच्या मुलाला मारहाण केलेल्या महिला पोलिस फौजदारावर फक्त ताकीद देण्याची कारवाई आयुक्तांनी केल्याने त्याचा सूड उगविला असल्याची कुजबुजही ऐकायला मिळाली आहे. मात्र, त्याचा स्वत चाबूकस्वार यांनी आज नागपूरहून 'सरकारनामा'शी बोलताना इन्कार केला.
Gautam Chabukswar Rashmi Shukla
Gautam Chabukswar Rashmi Shukla

पिंपरीः सहसा कधीही कुणावर न रागावणारे पिंपरीचे आमदार अॅड चाबूकस्वार यांनी पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांवर अतिशय तिखट काल (ता.18)शब्दांत हल्ला केल्याने पोलिस वर्तुळासह संपूर्ण शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे. इतर कोणाही आमदारांनी शुक्ला यांना टार्गेट केले नसताना फक चाबूकस्वारांनीच ते केल्य़ानेही आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातही शुक्लांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यावरच त्यांनी अकार्यक्षमतेचे गंभीर आरोप केल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

नियमित विपश्यना केल्याने स्थितप्रज्ञ व रागावर नियंत्रण मिळविण्यात यश आलेल्या आमदार चाबूकस्वार यांना अचानक आयुक्तांबाबत एवढा राग का येतो, की ज्यातून ते त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी करतात, यामागील सत्यता जाणून घेण्याचा 'सरकारनामा'ने प्रयत्न केला. त्यातून उद्योग कमी होत चाललेल्या उद्योगनगरीत हे भलतेच उद्योग वाढल्यामुळे शांत आमदारांचा पारा चढल्याचे दिसून आले. त्यातही वाहन तोडफोडीचे वाढते सत्र, अल्पवयीनांचा गंभीर गुन्ह्यांतील वाढता सहभाग, महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ यामुळे आमदार अस्वस्थ असल्याचे व झाल्याचे दिसून  आले. 

दरम्यान कालही (ता.18) पिंपरी पोलिस ठाण्यासमोरच वाहने फोडली गेली. तर, पिंपरी चौकात दोन अल्पवयीन मुलांना पिस्तूलासह पकडण्यात आले. या घटना आमदारांच्या गुन्हेगारी वाढल्याच्या चिंतेला पुष्टी देणाऱ्या घडल्या आहेत.त्यातही पुण्याच्या तुलनेत उद्योगनगरीत त्यातही आमदारांच्या मतदारसंघात पिंपरी गेल्या दोन वर्षात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेही आमदार अस्वस्थ आहेत. त्यात लोकसभा व त्याबरोबरच विधानसभा निवडणुक एकत्रच काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरीतून पुन्हा इच्छूक असलेल्या आमदारांना त्याबाबत काळजी वाटू लागली आहे.

गेल्या वर्षी पूलावर वाढदिवस साजरा करणाऱया आमदारांच्या मुलाला मारहाण केलेल्या महिला पोलिस फौजदारावर फक्त ताकीद देण्याची कारवाई आयुक्तांनी केल्याने त्याचा सूड उगविला असल्याची कुजबुजही ऐकायला मिळाली आहे. मात्र, त्याचा स्वत चाबूकस्वार यांनी आज नागपूरहून 'सरकारनामा'शी बोलताना इन्कार केला.ही घटना जुनी आहे. या घटनेचा याच्याशी काहीही सबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ही घटना होण्यापूर्वीपासून अधिवेशनात पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर कुणाही आमदारांनी शुक्लांविरुद्ध तक्रार केली नाही, याकडे लक्ष वेधले असता चाबूकस्वार म्हणाले, ''त्यांना वाढत्या गुन्हेगारीचे काहीच वाटत नसावे.''

दुसरीकडे पोलिस आयुक्त शुक्ला प्रामाणिक आहेत, यात वाद नाही. मात्र, पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर पुण्यातही अवैध धंद्याचा सुळसुळाट झालेला आहे. कालच हिंजवडीमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तरुणींच्या कॉलगर्ल रॅकेटचा शहर पोलिसांच्या गुन्हा शाखेने पर्दाफाश केला. गंभीर गुन्हे घडतच आहेत. चेनस्नॅचिंग वाहन तोडफोड याला आळा बसलेला नाही. शुक्लांना आपल्या कामाचा ठसा उमटविता आलेला नाही. त्याउलट सुनील रामानंद हे सहआयुक्त असताना शहरातील सर्व धंदे पूर्ण बंद होते. ते रामानंद शुक्ला यांच्या कार्यपद्धतीमुळे रजेवर गेले आणि पुन्हा अवैध धंदेवाले शहरात परतले. नंतर रामानंद यांच्या बदलीने त्यांची अवैध धंद्यांची मांड पक्की झाली. एकूणच आमदारांनी आयुक्तांच्या केलेल्या बदलीमागे 'आधा सच,' तर नक्कीच आहे, हे म्हणायला पुरेसा वाव आहे. फक्त मुख्यमंत्री त्याची दखल घेतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com