Why congress party is avoiding action against Nitesh Rane ? | Sarkarnama

काँग्रेस विरोधी पक्ष नेतेपद टिकवण्यासाठी नितेश राणेंवर कारवाई करीत नाही !

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
शुक्रवार, 2 मार्च 2018

मुंबई  : काँग्रेस आमदार नितेश राणे सध्या एकटे पडले आहेत.  विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरकारविरोधी आक्रमक असताना नितेश राणे आपल्या जागेवर बसून असल्याचे चित्र दिसते. आमदार नितेश राणे व कालिदास कोळबंकर यांच्यावर कार्यवाही केल्यास काँग्रेसचे 2 आमदार कमी होतील. ज्यामुळे विधानसभेत विरोध पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे जाण्याची भिती काँग्रेसला वाटत आहे.

मुंबई  : काँग्रेस आमदार नितेश राणे सध्या एकटे पडले आहेत.  विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरकारविरोधी आक्रमक असताना नितेश राणे आपल्या जागेवर बसून असल्याचे चित्र दिसते. आमदार नितेश राणे व कालिदास कोळबंकर यांच्यावर कार्यवाही केल्यास काँग्रेसचे 2 आमदार कमी होतील. ज्यामुळे विधानसभेत विरोध पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे जाण्याची भिती काँग्रेसला वाटत आहे.

नितेश राणे मात्र  कागदोपत्री काँग्रेसचे आमदार राहिले असून  मनाने  नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासोबत ते केंव्हाच गेलेले आहेत .सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय आधिवेशन सुरू आहे. आधिवेशनाचा पहिला आठवडा संपला आहे. पहिल्या दिवसापासून विरोधी काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार सरकारविरोधी आक्रमक झाले आहेत.

मात्र, त्यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार नितेश राणे नसल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी, बोंडआळी आणि गारपिठीचे नुकसान भरपाई मिळावी याबाबत विधानसभेत चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. मात्र, शेतीप्रश्नी विरोधक वेलमध्ये उतरत सरकारविरोधी घोषणा देतात तेंव्हा काँग्रेसचे आमदार नितेश राणे जागेवरच  बसून असल्याने आमदार नितेश राणे एकटे पडल्याचे दिसत आहे.

आमदार नितेश राणे हे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. आमदार नितेश राणे यांनी वेळोवेळी केल्या भाषणाचे कौतुक त्यांच्या विरोधकांनीही केले आहे. नितेश राणे यांनी मराठा आरक्षण मागणीच्या संदर्भाने विधानसभेत केलेल्या अभ्यासपुर्ण भाषणाचा उल्लेख अनेकवेळा सदस्यांनी केला आहे.

सध्या मात्र काँग्रेसची ही तोफ थंडावली असल्याचे दिसत आहे. आमदार नितेश राणे यांची वडिल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदासह विधान परिषदेचा राजीनामा देत काँग्रेसविरोधातच दंड थोपटले.

त्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेना व काँग्रेस पक्षाला लक्ष करत "महाराष्ट्र स्वाभिमान " नावाच्या पक्षाची स्थापनाही नारायण राणे यांनी केली. यावेळी कोल्हापूर येथे झालेल्या विराट सभेत आमदार नितेश राणे यांना सहभागी होता आले नव्हते. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस पक्षाला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही.

नारायण राणे यांनी राजीनामा दिलेल्या जागेवर पोट निवडणुकीसाठी मतदानावेळीही नितेश राणे यांनी पक्षविरोधी काम  केले  होते . या निवडणुकीसाठी मतदान करताना काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व आमदारांना व्हीप बजावले होते.

मात्र, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर आणि आमदार नितेश राणे यांनी हा व्हीप स्वाकरलाच नव्हता.  त्याचबरोबर या दोघांनीही मतदानासाठी आल्यानंतर पक्ष कार्यालयात असलेल्या मस्टरवर सह्याही केल्या नव्हत्या. त्यामुळे या दोघांवरही या तांत्रिक मुद्द्यावर बोट ठेवत कार्यवाही करता येणे शक्य होते. मात्र काँग्रेस पक्षाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती.

आमदार नितेश राणे व कालिदास कोळबंकर यांच्यावर कार्यवाही केल्यास काँग्रेसचे 2 आमदार कमी होतील. ज्यामुळे विधानसभेत विरोध पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे जाण्याची भिती काँग्रेसला वाटत आहे. सध्या काँग्रेकडे 42 तर राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत.

काँग्रेसकडे एक आमदार जास्त असल्याने विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळाले आहे. या पदावर राधाकृष्ण विखे पाटील विराजमान आहेत. नितेश राणे व कालिदास कोळंबकरांवर कार्यवाही केल्यास काँग्रेसचे संख्याबळ कमी होवून ते 40 होईल. त्यामुळे काँग्रेसला हक्काचे विरोधी पक्षनेतेपद व पर्यायाने लाल दिवाही सोडावा लागेल. यामुळेच नितेश राणे यांनी काँग्रेसला वारंवार डिवचले तरी काँग्रेस पक्ष नितेश राणेंवर कार्यवाही करायला धजावत नसल्याचे दिसत आहे.

संबंधित लेख