भाजपने पालघर शिवसेनेला का सोडायचे ? 

भाजपने पालघर शिवसेनेला का सोडायचे ? 

पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युती होईल किंवा नाही हे सांगता येत नसले तरी पालघर लोकसभेसाठी शिवसेना का प्रतिष्ठा करीत आहे. भाजपने शिवसेनाला मुळात हा मतदारसंघ का सोडायचा ? हाच मुळ प्रश्‍न आहे. पालघरमध्ये 1989 पासून भाजपचाच खासदार राहिला आहे आणि आजही आहे. 

पालघरसह राज्यातील लोकसभेच्या 23 जागा मिळाव्यात अशी शिवसेनेची मागणी आहे. पालघरसाठी तर शिवसेना आग्रही आहे. राज्यातील असे काही मतदारसंघ आहेत की ज्यामुळे युतीचा निर्णय होऊ शकला नाही. पालघरमध्ये आज भाजपचे खासदार म्हणून डॉ. राजेंद्र गावीत निवडून आले आहेत.

यापूर्वी चिंतामन वणगा खासदार होते. त्यांचे आकस्मित निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसमधून एका रात्रीत भाजपवासी झालेले डॉ. गावीत निवडून आले. एका रात्रीत निष्ठा कशा बदलतात हे पालघरकरांनी अनुभवलेही. राजकारणात अशा कोलांटउड्या मारणे काही नवे नाही. त्याला डॉ. गावितही अपवाद नाहीत. 

मात्र खरा मुद्दा हा आहे कीे पालघर लोकसभा शिवसेनाला का म्हणून सोडायचा ? खरेतर हा प्रश्‍न भाजपची मंडळी दबक्‍या आवाजात का विचारत आहेत. पालघर मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर आपल्या असे लक्षात येईल की जुन्या रचनेनुसार जोगेश्‍वरी (मुंबई) ते पालघरपर्यंत उत्तर मुंबई मतदारसंघ होता. या मतदारसंघातून मृणाल गोरे, राम नाईक, गोविंदा आदी खासदार निवडून आले होते.

राम नाईकांनी तर इतिहास करीत 1989 ते 2004 पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व केले. सलग पंधरा वर्षे ते खासदार राहिले. रेल्वेमंत्रीही बनले. त्यानंतर त्यांना धुळ चारत अभिनेते गोविंदा येथे निवडून आले. त्यांना हितेंद्र ठाकूरांचा पाठिंबा होता. पुढे मतदारसंघाची रचना बदलल्यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघ वेगळा झाला. तो आदिवासी समाजासाठी राखीव झाला. 

तसेच पालघरच्या शेजारचा डहाणू तालुकाही लोकसभा मतदारसंघ होता. हा मतदारसंघ तिकडे नाशिक आणि इकडे भिवंडीपर्यंत पसरला होता. या मतदारसंघातून भाजपचेच चिंतावन वनगा निवडून येत असत. त्यांच्यापूर्वी कॉंग्रेसचे दामू शिंगडाही खासदार होते. पुढे डहाणू तालुका पालघर लोकसभा मतदारसंघात आला.

पालघरमधून ठाकूरांच्या आघाडीचे 2009 मध्ये बळिराम जाधव खासदार बनले. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत चिंतामन वनगा निवडून आले. त्यांच्या निधनानंतर डॉ. गावित आले. म्हणजेच पालघर हा युतीमध्ये भाजपकडे राहिला आहे. राम नाईक यांच्यानंतर वनगा खासदार बनले. 

आपण थोडा जर तरचा विचार करू या ! समजा जर वनगा हयात असते तर त्यांना बदलून शिवसेनेने या जागेवर दावा केला असता का ? याचाच अर्थ असा आहे, की येथे भाजपचाच खासदार होता. पालघरमध्ये शिवसेनेच्या मनीषा निमकर आमदार आणि राम नाईक खासदार असे समीकरण राहिले आहे. ते चिंतामन वनगांपर्यंत राहिले.

त्यांच्या निधनानंतर मात्र चित्रच बदलले. ज्या वनगांनी आपले संपूर्ण आयुष्य भाजपसाठी खर्च केले त्या निष्ठावंत नेत्याच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. भाजपने केलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले. त्यावेळी जे काही कारण राजकारण घडले ते महाराष्ट्रापुढे आहे. युतीतही आरोपप्रत्यारोप झाले आणि ती तुटलीही. 

येथे महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की पालघर शिवसेनेला का सोडायचे ? पालघर लोकसभा मतदारसंघाकडे दृष्टिक्षेप टाकला तर असे लक्षात येते की या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये शिवसेनेकडे केवळ पालघर सोडला तर अन्य एकही आमदार नाही. भाजपकडे डहाणू, विक्रमगड तसेच बहुजन आघाडीकडे बोईसर, नालासोपारा आणि वसई आहे. 

पालघर लोकसभा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. आम्ही येथे सातत्याने जिंकत आलो आहोत. त्यामुळे येथे शिवसेनेने दावा करणे चुकीचे आहे. जर पालघर भाजपला सोडले तर आमचे कार्यकर्ते नाराज होतील. काही लोकांचे म्हणणे आहे की बाहेर येऊन लोक येथे येतात. पण, त्यामध्ये तथ्य नाही. अनेक ठिकाणी तसे चित्र पाहण्यास मिळते. एक पोटनिवडणूक सोडली तर येथे युती म्हणूनच एकत्र लढलो आहोत. पालघर शिवसेनेला सोडता कामा नये अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. 
बाबाजी काटोळे, भाजप नेते, पालघर जिल्हा 

चिंतामन वणगा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाकडे भाजपने दुर्लक्ष केले. वनगांचे पूत्र श्रीनिवास शिवसेनेत आले. पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपशी कडवी झुंज दिली होती. तसा नैतिक विजय आमचाच झाला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे पालघर आम्हालाच मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण, शेवटी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल. 
विकास मोरे, शिवसेना तालुका प्रमुख, पालघर 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com