'संजय' यांच्या भूकंपाच्या दिव्यदृष्टीला "नाथां'ची वक्रदृष्टी 

'संजय' यांच्या भूकंपाच्या दिव्यदृष्टीला "नाथां'ची वक्रदृष्टी 

जळगाव : राज्यात 25 जुलैला राजकीय भूकंप होईल, त्याचा केंद्रबिंदू जळगाव असेल असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे भाजपवर नाराज असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या पक्षबदलाकडे "संजय' यांची दिव्यदृष्टी असावी अशी शक्‍यता व्यक्त होत असतानाच खडसेंनी मात्र गुलाबरावांसह शिवसेनेचेच आमदार भाजपत येत आहेत काय? अशी प्रतिक्रिया व्यक्त करून आपली "वक्र'दृष्टी दाखविली आहे. त्यामुळे आता भूंकप घडविणारे जिल्ह्यातील दुसरे व्यक्तिमत्व कोण? असा प्रश्‍न निर्माण होऊन त्यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.
 
भाजप- शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे. मात्र दोन्ही पक्षात आता जोरदार वाद सुरू आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अगदी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर दोन्ही पक्षाचे नेते एकमेकावर आरोप करीत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्‍नावर तर शिवसेनेने थेट रस्त्यावर उतरून भाजप सरकार विरोधात आंदोलन केले. राज्यातील शेतकरी संघटनाच्या नेत्यांसोबत बैठकित शासनाच्या मंत्रिगट समितीची दोन दिवसापूर्वी बैठक झाली. यात शासनाने सर्व शेतकरी आंदोलकांच्या सर्व मागण्या तत्वत: मान्य केल्या. त्यामुळे संघटनांनी आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या शिडातील हवा निघून गेली, सेना आता काय करणार? अशी चर्चा होत असतांनाच शिवसेने मात्र यातील तत्वत: शब्दाला विरोध करून आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत राज्याच्या दौऱ्यावर आहेत, नंदुरबार, धुळे येथे सभा घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे त्यांनी शिवसेनेतर्फे शेतकरी मेळावा घेतला. यात त्यांनी राज्यात भूंकप होण्याचा पुनरुच्चार करत 25 जुलै ही तारीखही जाहीर केली. विशेष म्हणजे याच सभेत त्यांनी उत्तर महाराष्ट्र हे भूंकपाचे क्षेत्र असून जळगाव केंद्रबिंदू राहणार असल्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील या भूंकपाच्या बळावरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे भाकीतही केले . त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडणे स्वाभाविक होते, आणि ती उडाली. 

खडसेंकडे वळल्या नजरा 
राऊत यांनी जळगाव राजकीय भूंकपाचा केंद्रबिंदू असल्याचे जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या. त्यांना मंत्रिमंडळातून राजकीय खेळी करून काढण्यात आल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही तसा आरोप केला आहे. स्वत: खडसे यांनीही पक्षांतर्गत खेळीबाबत नाराजी दाखविली आहे. खडसे हे राज्यातील मोठे नेते आहेत. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत खानदेशातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात भाजपचे खासदार, आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. शिवाय त्यांनी काही जणांना भाजपमध्येही प्रवेश दिला असून ते आमदारही आहेत. त्यामुळे राऊत यांच्या भविष्यवाणीतील राजकीय भूकंपाच्या उत्तर महाराष्ट्र, जळगावातील केंद्रावर खडसेंचे नाव अग्रक्रमाने चर्चिले जाणे अपेक्षित आहे. 

खडसेंची मात्र वक्रदृष्टी 
संजय राऊत यांच्या विधानानंतर भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यावेळी खडसे यांनी राऊत यांच्या या विधानावरच "वक्र'दृष्टी दाखविली. ते म्हणाले, शिवसेनेते नेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील सेनेचे आमदार भाजपत येत आहेत काय? अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांनी थेट संजय राऊतही यांच्यावरही हल्ला चढविला. आपण सध्या मुंबईत असून पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

तर भूकंप करणारा नेता कोण? 
खडसे यांच्या या भूमिकेमुळे आता उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात भूकंप करणारा नेता कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील आमदार शिवसेनेला मिळवून देत थेट उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविणारा विरोधी पक्षातील ताकदवार नेता कोण? याकडेच आता लक्ष लागले आहे. अर्थात, त्यासाठी आता 25 जुलैची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com