Who will lead Siddhivinayak Trust in Mumbai | Sarkarnama

प्रभादेवीच्या श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टवर झेडा कोणाचा लागणार?

महेश पांचाळ
शनिवार, 15 एप्रिल 2017

ट्रस्टचे अध्यक्षपद हे भाजपच्या नेत्याला मिळावे, असा नवीन प्रवाह स्थानिक पातळीवरुन सुरु झाला आहे. राज्यातील सत्तेत भाजपासोबत शिवसेना असल्याने, युतीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपदी शिवसेनेला मिळायला हवे आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस हे शिर्डीबरोबर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांवर कोणाची नेमणूक करणार हे ऑगस्ट महिन्यात स्पष्ट होईल.

मुंबई - राज्यातील प्रमुख देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी संस्थानापाठोपाठ मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवसेना आणि भाजपा यापैकी कोणाची वर्णी लागणार यावरुन चर्चा सुरु झाली आहे. देवस्थानामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही राजकीय पक्षांचे सोयरसुतक नसले तरी, राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या ट्रस्टवर आपल्या पक्षांचा झेंडा असावा, यावरुन सत्ताधारी भाजपा आणि सेनेकडून प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जाते.

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर भाजपाचे सुरेश हावरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती व्हावी यासाठी शिवसेना आग्रही असली तरी, भाजपाकडून या ट्रस्टवर स्वत:चा वरचष्मा ठेवण्याची शक्‍यता आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात शिर्डी संस्थानचा अध्यक्ष काँग्रेसचा तर सिद्धिविनायक मंदिराचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असा फॉर्म्युला असायचा.

राज्यात भाजपा सरकारने 2017 साली सत्तेवर आल्यानंतर, शिर्डी संस्थान आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची कार्यकारणी बरखास्त करुन, त्वरीत नवीन कार्यकारणी नेमली जाईल, अशी अपेक्षा होती. सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष राष्ट्रवादीचे सुभाष मयेकर यांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जुलै 2014 मध्ये सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नरेंद्र राणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. राणे यांच्या कार्यकारणीने विधी आणि न्याय विभागाकडे पाठपुरावा करुन, नव्या कार्यकारणीचे मुदत तीन वर्षासाठी असेल, अशी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन घेतली होती.

त्यामुळे, सत्तांतरानंतर, राष्ट्रवादीचे नरेंद्र राणे यांच्या अध्यक्षपदाला कोणताही धोका निर्माण झाला नव्हता. राणे यांनी आपल्या कारकिर्दीत ट्रस्टच्या माध्यमातून मोठया प्रमाणात समाजोपयोगी उपक्रम तसेच गरीब रुग्णांना मदत होईल, असे निर्णय घेतल्यामुळे, नरेंद्र राणे यांच्या विद्यमान कार्यकारणीबाबत राजकीय वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे. राणे यांच्या कार्यकारणीची मुदत ऑगस्ट 2017 ला संपत आहे.

दादर प्रभादेवी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दादर प्रभादेवी मतदारसंघातही शिवसेनेचे सदा सरवणकर हे आमदार आहेत. त्यामुळे पुढील कार्यकारणीसाठी अध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला यावे, अशी मागणी सेनेच्या गोटातून करण्यात येत असल्याचे समजते.

मात्र, विधानसभा निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाची या मतदारसंघातील मतांची टक़्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यात, ट्रस्टचे सदस्य महेश मुदलीयार यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे, ट्रस्टचे अध्यक्षपद हे भाजपच्या नेत्याला मिळावे, असा नवीन प्रवाह स्थानिक पातळीवरुन सुरु झाला आहे. राज्यातील सत्तेत भाजपासोबत शिवसेना असल्याने, युतीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपदी शिवसेनेला मिळायला हवे आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस हे शिर्डीबरोबर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांवर कोणाची नेमणूक करणार हे ऑगस्ट महिन्यात स्पष्ट होईल.

संबंधित लेख