पुण्यात भाजप-सेना युतीचा फटका टिळेकरांना की मेधा कुलकर्णींना?

पुण्यात भाजप-सेना युतीचा फटका टिळेकरांना की मेधा कुलकर्णींना?

पुणे : भारतीय जनता पार्टी-शिवसेनेच्या युतीची घोषणा आज झाली. युतीत झालेल्या जागावाटपानुसार 2009 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा शिवसेनेला तब्बल 21 जागा अधिक मिळाल्या आहेत. या जागांमधील पुण्यातील आठपैकी नेमक्‍या कोणत्या जागा शिवसेनेला सोडाव्या लागणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.

कोथरूड व हडपसर या दोन जागा शिवसेनेकडून मागितल्या जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे युतीसाठी भाजपच्या कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी व हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांना त्याग करावा लागण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपचे शहरात आठपैकी आठ आमदार आहेत. त्यामुळे येथे पक्षाला काही जागा शिवसेनेला सोडल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. त्याआधी 2009 च्या निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून लढले. त्यावेळी कोथरूडमधून चंद्रकांत मोकाटे तर हडपसरमधून महादेव बाबर निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेला वाढून मिळालेल्या 21 जागांमध्ये कोथरूड व हडपसरची जागा मिळावी, असा आग्रह शिवसेनेकडून राहण्याची शक्‍यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

नव्या जागा वाटपानुसार शिवसेनेला 21 जागा अधिक मिळाल्या आहेत. या 21 जागा राज्यभरातून द्याव्या लागणार आहेत. यामध्ये पुण्यातून किमान तीन जागा सोडण्याचा आग्रह शिवसेनेकडून होणार आहे. विशेष म्हणजे कोथरूड आणि हडपसरसाठी शिवसेनेचा आग्रह राहणार आहे.

महादेव बाबर हडपसरमधून तर चंद्रकांत मोकाटे कोथरूडमधून युतीचे आमदार होते. हे दोघे आता माजी आमदार असून पुणे शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे या दोघांसाठी शित्तसेना आग्रही राहिली तर भाजपाला या दोन जागा सेनेला द्याव्या लागणार आहे. मात्र कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. कुणीही उमेदवार असला तर पक्षाचा आमदार निवडून येईल, इतकी पक्षाची या मतदारसंघात भक्कम स्थिती आहे.

कोथरूडमधून निवडून आलेल्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कामाचा झपाटा लावला आहे. त्यामुळे इतका भक्कम मतदाररसंघ शिवसेनेसाठी सोडण्यास भाजपा सहजासहजी तयार होईल, असे वाटत नाही. 

हडपसरमध्ये भाजपचा पहिल्यांदाच आमदार झाला आहे. येथे पक्षाच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. टिळेकर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची जागा भाजप त्वरीत सोडणार नाही, अशीही चर्चा आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com