२०१९ मध्ये सत्ता कोणाची येणार, हे अगदी स्पष्ट : शरद पवार 

पुणे जिल्ह्यातील काही पत्रकारांनी लोकसभेचे अधिवेशन पाहण्यासाठी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचीही भेट घेतली. त्या वेळी त्यांच्याशी केलेली बातचीत. मोदी सरकारची कामगिरी ते पुरंदर विमानतळाचा प्रश्न अशा विविध प्रश्नांवर पवार यांनी दिलेली ही उत्तरे
२०१९ मध्ये सत्ता कोणाची येणार, हे अगदी स्पष्ट : शरद पवार 

प्रश्न : नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून गेल्या चार वर्षांत तुम्हाला कसे वाटले? 

उत्तर : मी प्रथम 1967 मध्ये विधानसभेवर निवडून आलो, तेव्हापासून अनेक पंतप्रधान पाहिले. ते निवडणूकप्रक्रिया संपली की देशाचे पंतप्रधान म्हणून वागायचे. मोदी हे मात्र भाजपचे पंतप्रधान म्हणूनच वागतात. निवडणूक त्यांच्या डोक्‍यातून बाजूला जात नाही. परवा कर्नाटकात गेले आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांवर टीका करून आले. देशाच्या पंतप्रधानाने इतके लहान झालेले मी पाहिलेले नाही. "मी म्हणेल तसेच होईल' या त्यांच्या नादात खाली टीम शिल्लक नाही.

प्रश्न : पण काही मंत्री चांगलं काम करत आहेत....

उत्तर ; नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांचा थोडा अपवाद सोडला, तर केंद्रात मंत्री कोण आहेत, ते करतात काय, हे सामान्य माणसाला कळत नाही. "त्यांचे कृषिमंत्री कोण आहेत व त्यांनी काय केले' असे मला अनेक लोक विचारतात. तुम्ही बारकाईने पाहा. महाराष्ट्रातील कर्जमाफीचे काय झाले? शेतीमालास योग्य भाव देण्याची हमी देऊनही हमीभाव मिळत नाही. केंद्र असो वा राज्य, या दोन्ही सरकारची धोरणे फसवी आहेत. यांचे काम कमी आणि जाहिराती जास्त! त्याचे आता अजीर्ण झाले आहे. त्यांचा सगळा कारभारच भरकटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सगळेच अस्वस्थ आहेत. 

प्रश्न : मग २०१९ च्या निडणुकीत काय होईल? 

उत्तर : भाजपने लोकसभेत एकहाती सत्ता आल्याच्या नादात अनेक मित्रपक्ष तोडले. शिवसेनेसारखे दुखावलेले अनेक मित्र पुन्हा त्यांच्या जवळ येणार नाहीत. त्यात महाराष्ट्रात भाजप व शिवसेना आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढले, तर सत्ता कोणाची येणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.'' 


प्रश्न : पुरंदरमधील नियोजित विमानतळास आपण सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक लोकांचा विरोध आहे. त्या संदर्भात आपली भूमिका काय राहील? 

शरद पवार: या विमानतळामुळे पुरंदरकरांचे भाग्य उजळणार आहे, असे मी म्हटले होते. मात्र, काही लोकांच्या मनात शंका असतील, तर त्यांच्याशी चर्चा करता येईल. काही लोकांची नाळ गावाशी जोडलेली असते, काहींना प्रकल्प- जमिनीचा मिळणारा मोबदला याविषयी पुरेशी माहिती समजलेली नसते, तर काही जणांची मानसिकताच नसते. त्यांना सरकारच्या मोबदल्याबद्दल विश्‍वास वाटत नाही. त्यामुळे माझ्या हाती विमानतळाचा निश्‍चित आराखडा, नकाशे आल्यावर मी त्या गावांमध्ये जाऊन लोकांशी थेट बोलणार आहे. लोकांशी म्हणजे लोकांशीच. मधल्या लोकांशी नाही. 

प्रश्न : विमानतळ पुरंदरला होऊ शकते काय? 

उत्तर : मध्यंतरी पुरंदरची अंजीर परिषद उरकून वाघापूरमार्गे जाताना मला शेतीपेक्षा मोकळ्या जागा जास्त दिसल्या. अनेक ठिकाणी तारांचे कुंपण केलेले होते. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. तरीही शेतकऱ्यांचे म्हणणे लक्षात घेतले पाहिजे. त्यांचे महसुली रेकॉर्ड अद्ययावत झाले पाहिजे. त्यांच्या पदरात नक्की काय पडणार आहे, ते "पॅकेज' पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन, महत्त्वाची स्थळे वाचवून विमानतळासाठी पडीक जमीन उपयोगात आणता येईल का, हेही पाहिले पाहिजे. आम्ही सत्तेत असताना भूसंपादनासाठी चारपट दर देण्याचा निर्णय घेतला. तो येथे लागू झाला पाहिजे. तरच त्यावर विचार करता येईल. मात्र, त्यासाठी सुसंवाद हवा. मी जिल्हाधिकाऱ्यांकडून तशी माहिती मागविली आहे. 

प्रश्न : पुरंदर, भोर, वेल्हे या तालुक्‍यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गुंजवणी धरण प्रकल्पाबाबत आपले धोरण काय आहे? 

उत्तर : गुंजवणी धरण प्रकल्पच नव्हे, तर कोठेही पाण्याच्या उपलब्धतेबाबत मी कधी विरोध केलेला नाही. या विषयावर माझी भूमिका कायम सकारात्मक राहिली आहे. फक्त लाभ सर्वांना झाला पाहिजे, यासाठी मी आग्रही असतो. राज्यमंत्री विजय शिवतारे हे त्या खात्याचे मंत्री आहेत. बंद पाइपमधून गुंजवणी धरणाचे पाणी वितरित करण्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनीच मला सांगितले. त्यांच्या खात्याचा तो विषय आहे, त्याचे नियोजन त्यांच्याकडे आहे. या परिस्थितीत मी अधिक भाष्य करणे उचित नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com