who plays with history must be punished : Avhad | Sarkarnama

इतिहासाची तोडमोड करणाऱ्यांचा कडेलोटच करायला हवा : आव्हाड

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धडाडीचे नेते आणि मुलुखमैदान तोफ असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज "सरकारनामा'शी फेसबुक लाईव्ह संवाद करताना अनेक प्रश्‍नांना थेट उत्तरे दिली, आपल्या राजकीय जडणघडणीबद्दल त्यांनी सविस्तरपणे सांगितले तसेच महाराष्ट्रभूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यास आपला का विरोध आहे तसेच भीमा कोरेगाव दंगलीला कोण कारणीभूत आहेत यावर त्यांनी आपली मते रोखठोकपणे मांडली. आव्हाड यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.

प्रश्न : बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्रभूषण, त्याला तुम्ही केलेला विरोध आणि त्यासाठी राज्यभर तुम्ही काढलेली शिवसन्मानयात्रा, पक्षाच्यापलीकडे जाऊन तुम्ही उभारलेले राज्यपातळीवरचे वैचारिक व्यासपीठ हे सगळे वेगळे आहे, हे राजकीय परिघाबाहेर पक्षाच्यापलिकडे जाऊन तुम्ही केलेले काम आहे, असे चौकट मोडायचे धाडस कसे केले तुम्ही ? 

उत्तरः मला काही यात धाडस वाटत नाही, चौकट मोडली असेही वाटत नाही, ही बाब मी विचारांची लढाई मानतो, बी. एम. पुरंदरे यांना जो मी विरोध केला तो विचारांची लढाई आहे. मी आजपर्यत कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही, मी केवळ याकडे वैचारिक लढाई म्हणूनच पाहतो. मी इथे पुन्हा एकदा सांगेन की ही गोष्ट देखील मी आदरणीय पवार साहेबांकडूनच शिकलो, मी एकदा, एका विरोधी पक्षातील नेत्याचा एका जमिनीचा चुकीचा 7-12 होता तो घेऊन गेलो होतो व त्यांना मी म्हणालो, "साहेब हे प्रकरण आपण लावून धरूया, साहेबांनी तो कागद पाहिला आणि ड्रॉवरमध्ये टाकून दिला ते म्हणाले, "जितेंद्र एखाद्याने तुझ्यावर कमरेखाली वार केला म्हणून तुही तसाच वार केला पाहिजेस असे नाही, त्याचे राजकारण त्याने कसेही करावे, आपण आपल्या पद्धतीने राजकरण करावे. पवार साहेबांसारखा असा प्रगल्भ विचार करणारा नेता आपल्याकडे दुसरा कोणीही नाही. त्यांच्यासारखा मोठ्या मनाचा नेता दुसरा कोणीही नाही. 

प्रश्न : पुरंदरे यांच्या पुरस्काराच्यावेळी तुम्ही जे आंदोलन केले, त्यामुळे तुम्हाला ज्या वेदना झाल्या, शिवसन्मान यात्रेवेळी जे अनुभव आले त्याबद्दल नेमके काय सांगाल ? 

उत्तर : पुरंदरे यांनी कांदबरीच्या माध्यमातून जे काही सांगितले तो इतिहास नाही, महाराजांची जी बदनामी झाली ती चुकीची आणि वेदनादायी आहे. इतिहास हा इतिहासच म्हणून सांगितला पाहिजे. पुरंदरे यांनी कादंबरीच्या माध्यमातून जिजाऊंची आणि शिवाजी महाराजांची बदनामी केली. महापुरुषांच्याबाबत जो गोंधळ निर्माण केला तो चुकीचा आहे, इतिहासाशी खेळ म्हणजे देशद्रोह आहे. हे सगळे अजून चालू आहे. आता जी सरकारने बालभारतीची पुस्तके तयार केली त्यात संभाजीमहाराजांविषयी चुकीची माहिती दिली तसेच मुस्लीमाविषयी चुकीचे सांगितले. इथल्या समजातील काही घटकांमध्ये काही महापुरुषांबद्दल राग आहे त्यामुळे ते अशी चुकीची महिती सतत देत असतात. त्याबद्दल आम्ही आवाज उठवला. आता शिवसन्मान यात्रेबद्दल सांगतो, माझा सहभाग वाढला त्याचे सगळे श्रेय मी श्रीमंत कोकाटे यांना देईन, त्यांची माझी आधीची काहीही ओळख नव्हती, त्यांनी माझे काही लेख वाचले होत ते माझ्याकडे आले त्यांनी मला यात सहभागी करून घेतले, राज्यभर फिरवले, मला भाषणे करायला लावली, प्रत्येक शिवसन्मान परिषदेत ते माझे भाषण शेवटी ठेवत असत. मला त्याचे मोठे सहकार्य लाभले. मी आयुष्यात एक करत आलोय, ज्यांनी ज्यांनी माझे बोट धरलंय त्यांना कधीही मी विसरत नाही, मी आईला विसरणार नाही. मी पवार साहेबांना विसरणार नाही. मी पद्‌मसिह पाटील तसेच सुरेश कलमाडी यांना विसरणार नाही, त्याचप्रमाणे मी श्रीमंत कोकाटे यांना विसरणार नाही. जेम्स लेन प्रकरणानंतर महाराष्ट्रात जी वैचारिक लढाई करण्यासाठी नवी माणसे पुढे आली त्यात ते एक आहेत. जेम्स लेनला मदत करून ज्यांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊंची बदनामी केली, त्याला माफीच नाही. यांनी इतिहासाची तोडमोड केली आहे यांचा खरेतर कडेलोटच केला पाहिजे. 

प्रश्न : हे मुद्दाम सगळे होतेय का ? जाणीवपूर्वक केले जाते आहे का ? 
उत्तर : निश्चितच. हे जाणीवपूर्वक होते आहे, यात शंकाच नाही. इतिहास हा इतिहासच असला पहिजे त्यात चुकीच्या आणि कल्पित बाबी असता कामा नये.  मासाहेबांविषयी म्हणजे जिजाऊंबद्दल माहिती देताना तारतम्य बाळगले पाहिजे. ते काहींनी केलेले नाही. 

प्रश्न : जो चुकीचा इतिहास सांगितला जातो, त्याला आक्षेप घेणाऱ्याला विरोध करणाऱ्याला विद्रोही ठरवले जाते, त्याला इथली काही मंडळी बाजुला काढतात, त्याच्याबद्दल गैरसमज पसरवतात, त्याचा सामना कसा करायचा?

उत्तर: याला विरोध करावाच लागेल, मी ही विचारांची लढाई मानतो आणि ही विचारांची लढाई आम्ही करतच राहणार , एक उदाहरण देतो, भीमा कोरेगावची दंगल ही पूर्वनियोजीतच होती, तिथल्या लोकांना चुकीचा इतिहास सांगून भिडे आणि एकबोटे यांनी तिथे दंगल घडवली. 1818 पासून तिथे दलित समाज तिथल्या स्तंभाला वंदन करण्यासाठी जातोय, त्यांच्या भावना काय आहेत आणि ती लढाई कुणामध्ये झाली हे मुद्दे क्षणभर बाजुला ठेवू या, पण मुद्दाम चुकीची माहिती सांगून तिथले वातावरण बिघडवण्यात आले हे कसे नाकारता येईल. हे जर सांगितले नाही तर आम्ही चूक ठरू. ज्या पुरोगामी महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर यांनी धर्मद्वेष आणि जातीद्वेष नष्ट करायचा प्रयत्न केला त्याच पुरोगामी महाराष्ट्रात असे जातीद्वेष आणि धर्मद्वेष पसरवण्याचा प्रयत्न होत असतील तर ते दुर्देवी आहे. 
 

वाचा मुलाखतीचा आधीचा भाग- अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा सन्मान करणारा शरद पवार यांच्या सारखा दुसरा नेता मी पाहिला नाही : जितेंद्र आव्हाड

 

संबंधित लेख