When Pankaja Munde & Dhanajay Munde meet by coincidence | Sarkarnama

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण -भाऊ अचानक समोरासमोर येतात तेंव्हा !

दत्ता देशमुख 
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

 परळी शहरातपंकजा मुंडे आणि  धनंजय मुंडे हे दोघे अचानक आमने सामने आले . बुधवारी रात्री अचानक हा योग आला.

बीड : राजकारणामुळे पंकजा व धनंजय मुंडे भावंडाच्या रक्ताच्या नात्यातही अंतर पडले आहे. मात्र, बुधवारी दोघे अचानक एका ठिकाणी आमने - सामने आले .   दोघांनी एकमेकांना हात जोडले, दोघांच्या तोंडून एकाच वेळी "हॅपी दिवाळी" असे शब्द निघाले आणि मग दोघांनी एकमेकांच्या हातात हात दिले. 

 बचत गटांच्या महिलांसह अमेरिका दौऱ्याहून परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आज परळीला आल्या. तर, विरोधी पक्षनेते मंगळवार पासून मतदार संघात दुष्काळी पाहणी करत आहेत. दरम्यान, दिवाळीत आणि विशेषतः लक्ष्मीपूजन झाल्यानंतर राजकीय मंडळी व्यापाऱ्यांना शुभेच्छा देत असतात. तसे बुधवारी रात्री पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचे ताफे स्वतंत्रपणे परळी शहरातील  व्यापाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी निघाले. 

योगायोगाने दोघांचे ताफे मोंढा भागात पोचले. दोघेही व्यापाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन खुशाली विचारत होते. याच दरम्यान दोघांचेही ताफे एकाच वेळी आडत व्यापारी सुरेश मुंडे यांच्या दुकानात साडे आठ वाजता पोचले.

योग असा की दोघांनी आपसूक एकाचवेळी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. नंतर "हॅपी दिवाळी" असे शब्दही दोघांच्या तोंडून एकदाच निघाले. नंतर दोघांनी एकमेकांच्या हातात हात दिले. ही भेट एवढ्यावरच संपली. यानंतर, धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांच्याशी स्वतंत्र संवाद साधून त्यांनाही शुभेच्छा दिल्या. दुरावलेल्या भावंडांचा असाच भेटीचा योग येत रहावा अशीच भावना यावेळी दोघांच्या कौटुंबिक हितचिंतकांची असावी. 

संबंधित लेख