what will happen in Indapur? | Sarkarnama

दोन्ही काॅंग्रेसच्या आघाडीसाठी अजितदादा आमदार भरणेंना वाऱ्यावर सोडणार?

राजकुमार थोरात
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

वालचंदनगर : कॉग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक  चव्हाण यांनी इंदापूरमधून कॉग्रेसचे हर्षवर्धन पाटील निवडणूक लढविणार असल्याचे सांगितल्याने यावर राष्ट्रवादी काॅंग्रेस काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.

वालचंदनगर : कॉग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक  चव्हाण यांनी इंदापूरमधून कॉग्रेसचे हर्षवर्धन पाटील निवडणूक लढविणार असल्याचे सांगितल्याने यावर राष्ट्रवादी काॅंग्रेस काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांना वाऱ्यावर सोडणार का की इंदापूरच्या जागेसाठी शेवटपर्यंत अडून राहणार, याची आगामी काळात उत्सुकता राहील. अजितदादा भरणेंसाठी ठाम राहिले तर  राज्यातील कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या आघाडीमध्ये पेच निर्माण होण्याचा धोका आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने इंदापूरची जागा काॅंग्रेससाठी सोडली तर अजितदादांच्या शब्द इंदापूरबाबत खरा ठरणार नसल्याचा संदेश जाईल.

गेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेस स्वतंत्र लढल्याने दोन्ही पक्षाच्या जागा कमी झाल्या आहेत. येणाऱ्या २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजप-सेनेचा विजय रथ रोखायचा असले तर दोन्ही पक्षांना आघाडी केल्याशिवाय पर्याय नसल्याने त्यादृष्टीने पावले पडत आहेत. 

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे काॅंग्रेसचे वजनदार उमेदवार असुन त्यांनी १९ वर्षे मंत्रीमंडळामध्ये काम केले आहे .तर राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे हे विद्यामान आमदार आहेत. अजित पवार यांनी  ३० एप्रिल रोजी अंथुर्णे (ता.इंदापूर) येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे निक्षून सांगितले होते. दोन्ही काॅंग्रेसमध्ये आघाडी नाही झाली  तरी चालेल पण राष्ट्रवादी कॉग्रेस इंदापूरची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळेच ही जागा दोन्ही पक्षांसाठी आता प्रतिष्ठेची झाली आहे.

अजितदादांच्या इशाऱ्यानंतर काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी धीर देताना हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांच्या बोलण्याकडे लक्ष देवू नका. आघाडीचा निर्णय दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार असल्याचा टोमणा मारला होता. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखेपाटील या सर्वांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी जोर लावला.

इंदापूर हा काॅग्रेसचा १९५२ पासून बालेकिल्ला आहे. यामुळे इंदापूरच्या जागेवरती कॉग्रेसचा हक्क असल्याचे अशोक चव्हाणांनी निक्षून सांगितले. तसेच जनतेने हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली असुन काॅग्रेसचे ते विधानसभेचे उमेदवार आहेत. वेळप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून पाटील यांच्या पारड्यामध्ये वजन टाकले. त्यामुळे इंदापूरचा संघर्ष दोन्ही पक्षांत आतापासूनच सुरू झालेला आहे. 
 

संबंधित लेख