What will CM announce in the Shivangram meet in next month? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

शिवसंग्रामच्या जानेवारीतील मेळाव्यात मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार?

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 29 डिसेंबर 2018

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित महायुतीमधील मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याअनुषंगानेच शिवसंग्रामच्या प्रदेश नेत्यांशी तब्बल एक तास बैठक घेऊन मंत्रिमंडळ विस्तारासह महामंडळावरील नियुक्‍त्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

अकोला : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित महायुतीमधील मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याअनुषंगानेच शिवसंग्रामच्या प्रदेश नेत्यांशी तब्बल एक तास बैठक घेऊन मंत्रिमंडळ विस्तारासह महामंडळावरील नियुक्‍त्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडून भाजपप्रणित महायुतीची वाट धरली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत केंद्र आणि राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, सत्तेच्या वाट्यात शिवसंग्रामच्या वाट्याला केवळ शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद मिळाले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाई आठवले गटासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना लाल दिव्यासह अनेक महामंडळावर नियुक्‍त्या मिळाल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात विनायक मेटे यांना झुलवत ठेवण्यात आले. त्यामुळे शिवसंग्रामच्या नेत्यांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून महायुतीतील घटक पक्षांमध्ये सत्तेतील वाट्यावरून धुसफूस सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस करीत आहेत. 

या अनुषंगानेच सह्यादी अतिथीगृहावर नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे, प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघ शिवसंग्रामचे संदीप पाटील यांना सोडला असताना ऐन वेळी भाजपने उमेदवार उभा करून दिलेला शब्द पाळला नसल्याचे तानाजीराव शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 

मात्र, आगामी निवडणुकीत असा प्रकार होणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केले. मंत्रिमंडळ विस्तारात विनायक मेटे यांना स्थान देण्यासोबतच महामंडळावरही शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे औरंगाबाद येथे शिवसंग्रामने आयोजित केलेला महानिर्धार मेळाव्यास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीसाठी शिवसंग्रामने मेळाव्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हा मेळावा 27 जानेवारीला होणार असून या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस काय घोषणा करतात? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

संबंधित लेख