What happened in Eknath Khadse's Delhi tour ? | Sarkarnama

एकनाथ खडसे यांच्या दिल्ली दौऱ्यात घडले काय?

सरकारनामा
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

खडसे यांना पुन्हा संधी देण्याची हीच वेळ योग्य असून विलंब झाल्यास खडसेंची नाराजी पक्षासाठी हितावह राहणार नाही, असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे.

मुंबई : भाजपचे असंतुष्ट नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे दोन-तीन दिवसांपूर्वी दिल्ली दौरा करून आले असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. मात्र खडसे यांच्या या दौऱ्यांची फलनिष्पत्ती काय? याचा उलगडा अद्याप राजकीय वर्तुळात झालेला नाही.

एकनाथ खडसे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बऱ्याच प्रयत्नानंतर भेट झाली असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. मात्र पक्षातून खडसे आणि शहा यांच्या भेटीचा अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.

एकनाथराव खडसे हे दोन दिवस दिल्लीमध्ये तळ ठोकून बसले होते असे समजते. या दरम्यान त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. आपल्या हातून असा कोणता गुन्हा घडला की ज्यामुळे पक्षाने आपल्याला राजकीय विजनवासात ढकलले ? असा प्रश्‍न खडसेंनी योग्य ठिकाणी विचारला असल्याचे समजते.

गेली तीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून केलेल्या संघर्षाची उजळणीही त्यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात काही नेत्यांनी एकनाथराव खडसे यांची कैफियत सहानुभूतिपूर्वक ऐकून घेतली आणि योग्य वेळी पक्ष तुम्हाला संधी देईल, असे त्यांना सांगितल्याचे समजते.

एकनाथराव खडसे हे भाजपचे जुन्या पिढीचे शिलेदार आहेत. जळगाव जिल्ह्यात अनेक मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला खडसे यांचा जनसंपर्काचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे खडसे यांना पुन्हा संधी देण्याची हीच वेळ योग्य असून विलंब झाल्यास खडसेंची नाराजी पक्षासाठी हितावह राहणार नाही, असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे.
 

संबंधित लेख