What is the contribution of Pruthviraj Chavan in Pandharpur's development? | Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाणांनी पंढरपूरसाठी किती दिवे लावले ?  : अतुल भोसले

भारत नागणे
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

त्यांच्या मूळ  कुंभारगावात त्यांचा  सरपंच नाही. ज्या कराड  शहराने त्यांना मागील निवडणूकीत आघाडी दिली होती. तिथे  त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला नाही. - अतुल भोसले

पंढरपूर : " पृथ्वीराज चव्हाण  मुख्यमंत्री असताना  त्यांनी पंढरपूरसाठी किती दिवे लावले ते आधी जाहीर करावे आणि मगच त्यांनी आमच्या कामा विषयी बोलावे. त्यांच्या मूळ  कुंभारगावात त्यांचा  सरपंच नाही. ज्या कराड  शहराने त्यांना मागील निवडणूकीत आघाडी दिली होती. तिथे  त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला नाही. देशाची आणि राज्याची काळजी घेण्यापेक्षा  आधी आपल्य़ा  गावाकडे लक्ष द्या," असा टोला  मंदिर समितीचे अध्यक्ष व भाजपाचे नेते डाॅ. अतुल भोसले यांनी  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज पंढरपुरात लगावला.

पंढरपूर  येथील विठ्ठल दर्शन  पास विक्रीचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी  कराड येथील त्यांचे राजकीय  प्रतिस्पर्धी भाजपाचे नेते व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले यांना लक्ष केले आहे.  काॅंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रे दरम्यान  चव्हाण यांनी पंढपुरात   दर्शन पास विक्री करणार्या सोनेरी टोळीचा मोरक्या कोण आहे, त्याचा शोध घ्यावा  अशी मागणी करत डाॅ.भोसले यांच्यावर  अप्रत्यक्ष टीका  केली होती.  त्यांच्या टीकेला आज डाॅ.भोसले यांनी उत्तर दिले.

विठ्ठल दर्शन पास विक्री प्रकरणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये सदस्य सचिन अधटराव यांचे निलंबन करण्याचा ठराव बहुमतांनी मंजूर करण्यात आला. बैठकीनंतर डाॅ.भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

डॉ . अतुल भोसले म्हणाले," माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा जनाधार संपला आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्तपणे विधाने करु लागले आहेत. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.  त्यानंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विषयी बोलत होते. भाजपाच्या मोठ्या नेत्यांविषयी  त्यांच्याकडे  बोलण्यासारखे काहीच शिल्लक नसल्याने ते आता माझ्या विषयी बेताल वक्तव्ये करु लागले आहेत. "

" आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने काॅंग्रेसच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा काढली आहे. यात्रेच्या निमित्ताने ठिकठिकाणी सभा, रॅली काढली जात आहे. कराड येथील सभेला अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही तर पंढरपूरच्या सभेला लोकच न आल्याने सभा रद्द करावी लागली, अशा परिस्थितीत आता माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात  लक्ष द्यावे ,"असे सल्ला ही डाॅ.भोसले यांनी यावेळी  बोलताना दिला. 
आगामी काळात चव्हाण आणि भोसले यांच्यात चांगलेच वाक् युध्द रंगण्याची शक्यता व्यक्त  केली जात आहे. 

 

संबंधित लेख