पश्‍चिम बंगालमध्ये सत्ताकांक्षेचं रूतलेलं "रथचक्र' 

भारतवर्षाच्या चारही दिशांना सार्वत्रिक निवडणुकीची रणवाद्यं वाजू लागली असून विविध पक्षांत जागावाटप, संभाव्य आघाड्यांची घटमांडणी सुरू झाली आहे. अशा स्थितीत मध्यभारतातील तीनही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागणाऱ्या भाजपच्या सत्ताकांक्षी रथयात्रेचं चाक "वंगभूमी'मध्येही रूतलं आहे. त्यामुळे खरंतर ही वेळ भाजपसाठी विचारमंथनाची आणि त्यांचे मॉडर्न चाणक्‍य अमित शहांसाठी आत्मपरीक्षणाची आहे.
पश्‍चिम बंगालमध्ये सत्ताकांक्षेचं रूतलेलं "रथचक्र' 

बंगाली राजकारणाचं राजनितीसार समजून न घेताच शहांनी आपलं घोडं दामटलं अन्‌ स्वत:हासह पक्ष संघटनेलाही एका चक्रव्यूहात अडकून टाकलं. सत्तेचा "हिंदी'बेल्ट सैल झाल्यानंतर भाजपनं दक्षिण भारतात आणि आता रथयात्रेच्या माध्यमातून पश्‍चिम बंगालमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

कारण याआधी भाजपच्या सत्तेचं स्वप्न अशाच एका या रथयात्रेत बसून आलं होतं. तेव्हा भाजपच्या रथाचे सारथ्य करणारे लाल"कृष्ण' सध्या विजनवास भोगत आहेत, हा झाला नियतीचा न्याय..! 

आताही "गणतंत्र बचाओ'चा टॅग लावून भाजपचे तीन रथ वंगभूमीतील 42 लोकसभा मतदारसंघ पादाक्रांत करणार होते. पण तितक्‍याच धूर्त ममतांनी शहांचे मनसुबे ओळखून त्यांच्यासमोर आंधळी न्यायदेवता उभी केली. त्यामुळं हे प्रकरण न्यायालयात गेलं,

सुरवातीला दिलासा देणाऱ्या भाजप सैन्याचा लगाम नंतर त्याच कलकत्ता उच्च न्यायालयाने आवळल्याने पक्षाला सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठवावं लागलं. आता यावर न्यायालयानं कधीही निवाडा केला तरी तृणमूल कॉंग्रेसला फारसा फरक पडणार नाही; कारण ममता बॅनर्जी वेळेच्या बाबतीत अमित शहांच्या एक पाऊल पुढं गेल्या आहेत. 

मागील निवडणुकीत भाजपने पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभेच्या दोन जागा जिंकत सोळा टक्के एवढी मते स्वत:कडे खेचली होती, 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतांचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांवर आले आणि तीन जागांवरही पक्ष विजयी झाला होता. हाच शुभसंकेत मानत शहांनी लोकसभेच्या 22 जागा जिंकण्याचे टार्गेट स्थानिक नेत्यांसमोर ठेवले, प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी रथयात्रांचा घाट घालण्यात आला. 

खरंतर येथेच शहांची गल्लत झाली. ममता म्हणजे मायावती, जयललिता, वसुंधराराजे किंवा मेहबूबा मुफ्ती नव्हेत, त्यांच्या राजकारणाचा पोत वरून मवाळ पण मधून एखाद्या "हार्डकोअर कॉम्रेड'सारखा आक्रमक आहे. दिल्ली ते गल्ली ममता कुणालाही नडू शकतात. त्यामुळे "महाआघाडी' असो अथवा "फेडरल फ्रंट' सर्वजण त्यांच्याबाबत सावधच असतात. 

भाजपच्या रथाचे घोडे न्यायालयाच्या पायऱ्यावर आणून ममतांनी एक लढाई तर जिंकलीच, पण त्याचबरोबर "भाजप हटाओ, बंगाली बचाओ'चा नारा देत प्रादेशिक अस्मितेचेही कार्ड पुढे केले. आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेचा मुद्दा तापवत संघप्रणीत हिंदुत्वालाही त्यांनी शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे "श्‍यामाप्रसाद मुखर्जी' कनेक्‍शन वापरत पश्‍चिम बंगालमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या भाजपसाठी आगामी लढाई इतकी सोपी नसेल. 

आतापर्यंत लाटेवरती सत्तेची गलबतं हाकणाऱ्या अमित शहा आणि पर्यायाने भाजपसमोर ममतांच्या "तृणमूल कॉंग्रेस'चं आव्हान हे मेरू पर्वताइतकेच मोठं आणि अभेद्य आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com