We will join hands with NCP on certain conditions : Prakash Ambedkar | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या काही अटी मान्य केल्या तरच त्यांच्याशी आघाडी : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

अरुण जैन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

आर्थिक दुर्बलांना सवलती मिळाव्यात ही आपली भूमिका आहे. मात्र त्यासाठी संविधानाचा अभ्यास करायला पाहिजे. 

-अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

बुलडाणा :  " काँग्रेसला आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही. भविष्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची आघाडी करायची झाल्यास राष्ट्रवादीसाठी आमच्या काही अटी राहतील. त्या मान्य झाल्या तरच आघाडी होईल ,"असे भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी बुलडाण्यात सांगितले. 

वंचित बहूजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने बुलडाण्यात आले असतांना आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड.आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले ," कोणत्याही परिस्थिती राज्यात व देशात मनुवादी विचारसरणीचे सरकार येवू नये. संविधान बदलविण्याचे मनसूबे सफल होवू नयेत यासाठी आपण काँग्रेसला प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर नाही. वंचितांच्या विकासासाठी त्यांचा सत्तेमध्ये सहभाग असला पाहिजे. धनगर, माळी, ओबीसी, भटके व मुस्लिम यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍यांना उमेदवारी दिली पाहिजे. घराणेशाहीचे समाजीकरण व्हावे अशी आपली भूमिका आहे."

 "या दृष्टीनेच वंचित बहूजन आघाडी तयार झाली आहे. राज्यभरात या आघाडीला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्र घेण्याच्या मानसिकतेत सरकार दिसत नाही. अ‍ॅट्रॉसिटी कायदा, हमीभावाचे गाजर, अशा गोष्टी फसव्या आणि केवळी निवडणूकीपुरत्या आहेत. आम्हीच कसे समाजाचे तारणहार आहोत हे दाखविण्यासाठी मराठा आरक्षणाचा विषय पसरविल्या जात आहे. आर्थिक दुर्बलांना सवलती मिळाव्यात ही आपली भूमिका आहे. मात्र त्यासाठी संविधानाचा अभ्यास करायला पाहिजे", असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले . 

या पत्रकार परिषदेला आमदार बळीराम शिरसकार, माजी आमदार लक्ष्मण माने, विजय मोरे, हरिभाऊ भदे, प्रदेश अध्यक्ष अशोकभाऊ सोनोने, जिल्हाध्यक्ष विष्णू उबाळे, नगरसेवक मो.सज्जाद, विजय गवई आदी  उपस्थित होते.

संबंधित लेख