We will defeat BJP in Loksabha & Vidhansabha elections | Sarkarnama

केंद्र व राज्यातील भाजप  सरकार खाली खेचणारच : अशोक चव्हाण 

आल्हाद जोशी 
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

केंद्रातील सरकार हुकुमशाही पद्धतीने कारभार करीत असून आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करून कॉंग्रेसला सत्ता द्या .

- अशोक चव्हाण

एरंडोल : " लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खोटी आश्‍वासन देऊन मतदारांची दिशाभूल करून सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  अशोक चव्हाण यांनी केले. 

कॉंग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सभेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्यसरकारच्या कामकाजावर आक्रमक शैलीत टीका केली. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असून कर्जाला व नापिकीला कंटाळून देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या महाराष्ट्रात केल्याचा आरोप त्यांनी केला. पेट्रोल व डिझेलची दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातील पैसा काढून स्वत:चे खिसे भरण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे सांगितले.

 माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनसंघर्ष यात्रेमुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असल्याचे सांगितले.

ते म्हणाले ,"महात्मा गांधी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणाचे बलिदान दिले आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकार फसवे सरकार असून शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे राजा उदार झाला व हाती भोपळा दिला आहे .  जनसंघर्ष यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे आगामी निवडणुकीत परिवर्तन निश्‍चित आहे . " मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. 

आमदार नदीम खान म्हणाले ," सद्यःस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले असल्याचे सांगितले. देशात बेरोजगारांची संख्या वाढली असून रोजगार निर्मितीसाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत ."

यावेळी प्रदेश सरचिटणीस डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, आमदार शरद रणपिसे यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जळगाव लोकसभा मतदार संघ व एरंडोल विधानसभा मतदार संघ कॉंग्रेससाठी सोडण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. 

सभेस माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव, आमदार भाई जगताप, खासदार हुसेन दलवाई, प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन, सचिन सावंत, राजू वाघमारे, प्रदीप पवार, माजी आमदार शिरीष चौधरी, विनायक देशमुख, दिलीप सानंदा, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, अशोक खलाणे, नगरसेवक योगेश महाजन, हेमलता पाटील, डॉ. राजेंद्र चौधरी, सुकलाल महाजन, शहराध्यक्ष संजय भदाणे, इम्रान सय्यद यांचेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसंघर्ष यात्रेचे ठिकठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

 

संबंधित लेख