We were always ready to obey Balasaheb Thakre"s commands - Diwakar Rawte | Sarkarnama

बाळासाहेबांनी  आदेश दिला की आम्ही तयारच असायचो- रावतेंनी जागवल्या ठाकरेंच्या  आठवणी

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मे 2017

बाळासाहेब आम्हाला बोलवायचे प्रोत्साहन द्यायचे. बाळासाहेबांनी फक्त आदेश दिला की आम्ही तयारच असायचो. आम्हाला बोलत असतानाच मधूनच मार्मिकमधून फोन यायचा. काँलम शिल्लक आहे. लगेचच बाळासाहेब बसल्या जागेवरून कोणत्याही विषयावर लिहून पाठवायचे. इतकी त्यांची भाषेवर पकड होती. बाळासाहेबांची भाषा म्हणजे आक्रमक .जे लिहायचे तसेच बोलायचे अन् जसे बोलायचे अगदी तसेच लिहायचे ." 

मुंबई: परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या लग्नाला पन्नास वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानिमीत्ताने दिवाकर रावते यांच्या लग्नाचा  सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

आपल्या भूतकाळात डोकावताना दिवाकर रावते भारावून गेले होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत  बाळासाहेब ठाकरे व त्यांचे वडिल प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या आठवणी दिवाकर रावते यांनी  जागवल्या.

सरकारनामाशी बोलताना दिवाकर रावते म्हणाले," बाळासाहेब आपल्या कार्यकर्त्यांचे मनापासून काळजी घ्यायचे. बाळासाहेब न सांगता थेट घरी जावून जावून सगळं ठिक सुरूयं ना याची चौकशी करायचे. त्यामुळे आमच्या घरच्यांनाही शिवसेनेचे काम करत असली तरी काळजी नसायची.

सुरवातीला आम्ही बाळासाहेबांकडे घरी जायचो तेंव्हा दादा ( प्रबोधनकार ) आम्हाला बसवून घेवून शाहूमहाराज, गाडगेबाबा यांच्या गोष्टी सांगायचे. आम्ही तरूण त्यामुळे उत्साही कार्यकर्ते पण बाळासाहेबांच्या सोबतच दादांच्या बोलणे काळजीपुर्वक ऐकायचो. " 

बाळासाहेबांची काम करण्याची पध्दीबद्दल आठवणी जागवताना रावते म्हणाले, " डाव्या चळवळीबरोबर संघर्ष करताना सुरवातीला आमच्यावर दडपण असायचे. त्यावर बाळासाहेब आम्हाला बोलवायचे प्रोत्साहन द्यायचे. बाळासाहेबांनी फक्त आदेश दिला की आम्ही तयारच असायचो. आम्हाला बोलत असतानाच मधूनच मार्मिकमधून फोन यायचा. काँलम शिल्लक आहे. लगेचच बाळासाहेब बसल्या जागेवरून कोणत्याही विषयावर लिहून पाठवायचे. इतकी त्यांची भाषेवर पकड होती. बाळासाहेबांची भाषा म्हणजे आक्रमक .जे लिहायचे तसेच बोलायचे अन् जसे बोलायचे अगदी तसेच लिहायचे " 

रावते पुढे म्हणाले,"बाळासाहेबांनी मला किल्लारी भूकंप झाल्यावर बोलवून घेतलं अन् सांगितलं सुधाकर आपल्याला काही तरी करावे लागेल. लगेच शिवसेनेने एक गाव दत्तक घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबई झालेल्या दंगलीतही आम्हाला बाळासाहेब धीर  द्यायचे. सगळ्या सहकाऱ्यांची चौकशी करायचे. " 

प्रबोधनकारांच्या आठवणी सांगताना दिवाकर रावते म्हणाले, दादांची स्मरणशक्ती कमालीची होती. ते जेंव्हा एखाद्या विषयावर लिहित असताना अचानकच थाबांयचे आणि आम्हाला समोरच्या कपाट ठेवलेले एखादं पुस्तक काढायला सांगायचे, अन् त्याचे अचूक पान नंबर सांगून मोठ्यांने वाचायला लावायचे. त्यानंतरच ते आपला संदर्भ तपासायचे व पुढे लिहायला घ्यायचे.

 " दादांचे लिखाण म्हणजे शब्दांची नवनिर्मीती असायची. त्यांच्या लिखाणात नेहमी नविन शब्दांची भर घातलेली असायची. दादांना शब्दांचे रिपीटेशन अजिबात चालायचे नाही. त्यामुळे दादा वर्तमान पत्र मोठ्यांने वाचायला लावायचे. माझ्या पत्नीने मराठीत डाँक्टरेट मिळवली त्यात सगळ्यात महत्वाचे योगदान दादांचे आहे. दादा माझ्या पत्नीला खास रोजचे वर्तमान पत्र मोठ्याने वाचायला लावायचे." 

 प्रबोधनकारांनी केलेले शिवसेना स्थापनेच्या वेळेचे मार्गदर्शन,संयुक्त महाराष्ट्र चळवळी वेळची परिस्थीती, आचार्य अत्रे यांच्या बरोबर झालेले वाद, शिवसेनेच्या वाढीचा काळ, बाळासाहेबांचे लेखन, बाळासाहेबांचे कार्टून, बाळासाहेबांचे बंधू व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे वडिल श्रीकांत ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेवटचा काळ या आठवणीचा पटही रावते यांनी मांडला. शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठवाडाविभागात सेनेच्या वाढीसाठी दिलेल योगदान, किल्लारी भूकंपात केले काम, किल्लारी भूकंपामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तात्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेल्या कामाची रावते आवर्जुन आठवण सांगतात. शिवसेनेच्या स्थापने पासून ते मंत्री व्हाया मुंबईचे महापौर पदापर्यंतचा प्रवासाविषयी रावते यांनी यावेळी बोलताना आठवणी सांगितल्या.
 

संबंधित लेख