We have stayed the the agitation to honor words of Chhatrpati Shahu Maharaj & Jaysingrao Pawar | Sarkarnama

शाहू छत्रपती महाराज व डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही  आंदोलन स्थगित केले   

सुनील पाटील 
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात 42 दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. मुंबईत 4 सप्टेंबरला मराठा स्वाभिमान गाडी मोर्चाचेही आयोजन केले होते. मोर्चा पश्‍चिम महाराष्ट्रातून मुंबईत धडक देणार होता. मात्र, शासन मागण्यांबाबत सकारात्मक असल्याने ठिय्या आंदोलनासह गाडी मोर्चा स्थगित केला आहे. आम्ही आंदोलन मागे घेतलेले नाही. 1 डिसेंबरपर्यंत आम्ही शासन काय करते, याची वाट पाहणार आहोत. त्यानंतर आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. 
- वसंतराव मुळीक 

कोल्हापूर  : "आम्ही कागदाच्या तुकड्यासाठी नव्हे, तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन स्थगित केले आहे.सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सुरू असलेले ठिय्या आंदोलन 1 डिसेंबरपर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे. शासनाने तोपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही, तर ते पुन्हा तीव्र केले जाईल," असे  सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी  सांगितले . 

बावीस मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थान लक्ष्मी विलास पॅलेस येथे लेखी पत्र दिले आहे. तो सकल मराठा समाजाचा विजय आहे, असेही त्यांनी सांगितले. 

श्री. सावंत म्हणाले, "9 ऑगस्टच्या क्रांती मोर्चात आम्ही शासनाच्या दारात जाणार नाही, असे ठणकावून सांगितले होते.   शाहूंच्या जन्मस्थळावर मागण्यांबाबत सकारात्मकतेचे पत्र शासनाने आम्हाला दिले आहे. हा आमचा विजय आहे. आम्ही कागदाच्या तुकड्यासाठी नव्हे, तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन स्थगित केले आहे."

" पुण्यात सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक झाली असून, त्यांनी आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. 1 डिसेंबरपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहोत. आमचा अजूनही शासनावर विश्‍वास नाही. शासनाला दिलेली ही शेवटची संधी व शेवटचा इशारा आहे.'' 

दिलीप देसाई यांनी शासनाने नोव्हेंबरमध्ये विशेष अधिवेशन घेणार असल्याचे सांगितल्याने आंदोलन स्थगित केल्याचेसांगितले .  तर हर्षल सुर्वे यांनी, शासनाने लेखी दिले आहे म्हणून आम्ही शांत बसणार नाही. शासनाच्या मानगुटीवर बसून आठ-पंधरा दिवसांनी काय केले, याचा आढावा घेणार आहोत, असे सांगितले.

 

 

संबंधित लेख