We are willing to include Prakash Ambedkar in grand alliance : Ajit Pawar | Sarkarnama

प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्यासाठी आम्ही इच्छूक : अजित पवार   

सरकारनामा
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

मंत्रिमंडळ विस्ताराची वारंवार होणारी घोषणा म्हणजे पक्षातील असंतुष्टांना गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. शिवसेना-भाजपला राम आठवू लागल्याने आता निवडणूक आली आहे, असे समजायचं.

- अजित पवार

पिंपरीः  " शिवसेना हा जातीयवादी पक्ष असल्याने त्यांना महाआघाडीत घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सर्व-धर्म समभाव मानणारे पक्ष एकत्र येतील .  प्रकाश आंबेडकर यांनी काहीही वक्तव्य केलेलं असलं तरी आम्ही त्यांना महाआघाडीत घेण्यासाठी इच्छूक आहोत," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .  

मनसेला बरोबर घेणार का ? या प्रश्‍नावर मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र  कालच्या बैठकीत मनसे बद्दल चर्चा झाली नाही . मनसेला आघाडीत यायचं असेल तर त्यांना त्यांचा अजेंडा बदलावं लागेल असं श्री. पवार म्हणाले .   
" गतवेळी विधानसभेला दोन्ही कॉंग्रेसची आघाडी न झाल्याने चूक झाली. आमची सत्ता गेली. त्यामुळे या चुकीची पुनरावृत्ती यावेळी करणार नसल्याचे सांगताना आघाडी लोकसभा व विधानसभेलाही नक्की होईल. एवढेच नाही,तर लोकसभेच्या तीन चतुर्थांश   जागांवर एकमतही झाले असून बाकीच्या ठिकाणी दिवाळीनंतर चर्चा होईल,"असेही ते म्हणाले .    

" युती झाली नाही, तर त्याचा फटका भाजपला बसणार आहे . म्हणूनच  शिवसेना भाजपवर विखारी टीका करीत असूनही भाजप गप्प  आहे . दुसरीकडे युतीसाठी भाजपने दबावतंत्राचा वापर शिवसेनेवर सुरू केला आहे. त्यातूनच त्यांनी शिवसेनेचे खासदार असलेल्या लोकसभेच्या मतदारसंघात मेळावे व सभा सुरू केल्या असून या बार्गेनिंग पॉवरव्दारे ते युती करावी, म्हणून शिवसेनेवर दबाव आणीत आहेत,'' असे पवार म्हणाले. 

" सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यामागे सरकारचा  मोठा  स्वार्थ आहे, असे सांगून  पवार पुढे म्हणाले," जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक हजारोच्या संख्येत आहे. या सर्वांना ५९ मिनिटांत एक कोटींचं कर्ज हे सरकार देऊ शकतं का? सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांना 59 मिनिटांत एक कोटी रुपये कर्ज देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेली घोषणा ही सुद्धा एक चुनावी जुमलाआहे ," अशी   टीका त्यांनी केली. 

पिंपरी -चिंचवड बद्दल बोलताना श्री . पवार म्हणाले,"मतदारांनी चुकीचे बटन दाबल्याने गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता बदलली. त्यामुळे न सुटलेल्या प्रश्‍नी जनतेनेच आता विचार करावा. शहराला कुणी वाली राहिला नसून  शहराचा विकास करण्याऐवजी पालकमंत्री, शहराचे खासदार व आमदार स्वतःच्या विकास कसा होईल,याकडे लक्ष देत आहेत. "

"त्याचे खापर, मात्र ते राष्ट्रवादीवर फोडत आहेत. पोलिसांतील वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये पोलीस आयुक्त कार्यालय झाले असून सुद्धा शहर गुन्हे  मोठया प्रमाणात वाढले आहेत . पाणी व कचऱ्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे, " अशी   टीका त्यांनी केली. 

 
 

 

 

 

संबंधित लेख