We are nationalist so we should bear it ! | Sarkarnama

आपण देशभक्त आहोत सहन करा ...शिवसेनेचे नांदेडकरांना आवाहन !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

क्षली हल्ल्यात २५ जवान शहीद, केंद्र सरकारचे प्रतिउत्तर नाही, आपण देशभक्त आहोत सहन करा! पेट्रोल-डिझेल तीन रुपयाने झाले महाग, बॅंकेत आपले स्वत:चे पैसे असून देखील काढता येत नाहीत, एटीएममध्ये कॅश नाही, लांबच लांब रांगा, आपण देशभक्त आहोत सहन करा!

नांदेड :  शिवसेनेतर्फे शहरात विविध ठिकाणी ‘आपण देशभक्त आहोत, सहन करा’ असे  बॅनर लावून  महाराष्ट्र दिन  करण्यात आला . 

आपण केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलो तरी सरकारच्या विरोधात असल्याचे दाखवून शिवसेनेचा हा प्रयत्न शहरात चर्चेचा विषय बनला आहे .
 येत्या आक्टोंबर महिन्यात नांदेड महापालिकेची निवडणुक असून त्या दृष्टीने शिवसेनेने तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आता नांदेडकरांमध्ये सुरू झाली आहे.  
 
शिवसेनेचे लावलेल्या त्या बॅनरवर सरकारच्या विराेधात  लिखाण केलेले आहे. ‘आपण देशभक्त आहोत सहन करा’ असे सांगण्यात आले असून विविध आघाड्यावर केंद्र आणि राज्य शासनाला  अपयश कसे येत आहे याची उदाहरणे देऊन नागरिकांमध्ये  असंतोष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे .

नक्षली हल्ल्यात २५ जवान शहीद, केंद्र सरकारचे प्रतिउत्तर नाही, आपण देशभक्त आहोत सहन करा!  पेट्रोल-डिझेल तीन रुपयाने झाले महाग, बॅंकेत आपले स्वत:चे पैसे असून देखील काढता येत नाहीत, एटीएममध्ये कॅश नाही, लांबच लांब रांगा, आपण देशभक्त आहोत सहन करा! काश्‍मीरमध्ये भारतीय सैन्यावर फुटीरवाद्यांचे हल्ले, शेतकऱ्यांची विक्रमी आत्महत्या, उपाय योजना नाहीत,आपण देशभक्त आहोत सहन करा!  तूर दाळीचे खरेदी केंद्र राज्य सरकारने बंद केले , शेतकऱ्यांना कर्ज माफी नाही आपण देशभक्त आहोत सहन करा ! 

गेल्या दोन दिवसांपासून लागलेल्या या बॅनरची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना नेमकी कोणाच्या बाजूने आहे. सत्तेत आहे की विरोधात आहे, याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर आगामी काळात होणाऱ्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची या बॅनरला किनार असल्याचे संदेशही सोशल मीडियावर फिरत आहेत.

 शिवसेना भाजपसोबत युती करून मोदी सरकारला पाठिंबा देते तसेच केंद्रात आणि राज्यातही सत्तेत सहभागी असून अनेक मंत्री शिवसेनेचे आहेत. परंतु जे विरोधकांनी सरकारला विचारावेत तेच प्रश्‍न स्वत:च शिवसेना सत्तेत असून विचारत असल्यामुळे त्याची देखील वेगळी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मिडियावर देखील शिवसेनेच्या बॅनरची काही जणांनी खिल्ली उडविली असून ‘सत्ताधारी अन् विरोधक म्हणून तुम्हाला सहन करतोय’ असे सांगत आहेत.

नांदेड जिल्ह्यात सध्या दहा पैकी शिवसेनेचे चार आमदार आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला अत्यल्प यश मिळाले. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या रूपाने नांदेडवर शिवसेनेचे वर्चस्व असले तरी कॉंग्रेसचे  आजही नांदेड जिल्ह्यात  वर्चस्व आहे. 

कधी काळी नांदेड जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या १५ वर्षात कॉंग्रेसने हळू हळू जम बसवत स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेत जिल्ह्यावर वर्चस्व मिळविले. आता पुन्हा शिवसेना जिल्ह्यावर वर्चस्व मिळवू पाहत आहे. मागील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी आगामी नांदेड महापालिका निवडणुकीत यश मिळावे, यासाठी सेनेच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या दर्शनी भागात लावण्यात आलेले हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून त्याची चर्चाही सुरू झाली आहे.  

संबंधित लेख