Was Demanding Banning of Sanatat Sanstha Since 2011 Says Prithviraj Chavan | Sarkarnama

सनातनवर बंदी घालण्याबाबत 2011 पासून सांगत होतो - पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्युरो
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, साहित्यिक कुलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येमागे जो विचार आहे तो देशाची मुलभूत विचारसरणी, डॉ. आंबेडकरांची राज्य घटना या सगळ्यांच्या विरोधात आहे. एखाद्याचे विचार पटले नाहीत, तर त्याला जगातुनच संपवा अशी वृत्ती बळावत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी व कृती त्यात आहे - पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : "सनातन संस्था दिसते तशी सरळ नाही. तिची विघातकता मला आधीच कळली होती. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवा. या संस्थेवर बंदी घाला असे मी 2011 पासून सांगत होतो, '' असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले. 

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शहर काँग्रेस तर्फे काँग्रेस भवन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी त्यांनी राज्यातील व देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, "सनातन ही संस्था काय काम करते, ते आता पुन्हा एकदा उघड झाले आहे. यापूर्वीही त्यांचे प्रकार उघडकीस आले आहेत. तेव्हा मोठे वादळ उठले होते. या संस्थेवर 2011 पासून बंदी घालावी असे माझे मत होते. त्यासाठी लक्ष घालण्याच्या सुचना संबंधीत यंत्रणांना दिल्या होत्या.

ते पुढे म्हणाले, "नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, साहित्यिक कुलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येमागे जो विचार आहे तो देशाची मुलभूत विचारसरणी, डॉ. आंबेडकरांची राज्य घटना या सगळ्यांच्या विरोधात आहे. एखाद्याचे विचार पटले नाहीत, तर त्याला जगातुनच संपवा अशी वृत्ती बळावत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी व कृती त्यात आहे. सध्या सत्तेवर असलेले त्याला जबाबदार आहेत. त्याच विचाराने ते सरकार चालवित आहेत. त्यांना आपण वेळीच सत्तेपासून बाजुला केले पाहिजे. सनदशीर मार्गाने त्यांना गाडुन टाका. त्यासाठी आगामी 2019 मधील निवडणूक हाच एकमेव मार्ग आहे. त्यादृष्टीने त्या निवडणुकीचे गांभीर्य प्रत्येकाने ओळखले पाहिजे."

यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक राहुल दिवे, नगरसेवक शाहू खैरे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख