Walse Patil and Adhalro on Manchar Water scheme | Sarkarnama

मंचरच्या पाण्यावरून वळसे पाटील व आढळरावांत श्रेयवादाची लढाई 

सुदाम बिडकर
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या मंचर शहरासाठीची पाणी योजना मंजूर झाली आणि या शहरात फ्लेक्स फलकाचा पूर आला. ही योजना आम्हीच आणली हे सांगण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात फ्लेक्सयुद्ध सुरू आहे.

पारगाव : उत्तर पुणे जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मंचर शहराच्या पावणे चौदा कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. 

सोशल मिडीया तसेच फ्लेक्‍स फलक यावर जोरदार "चकमक' सुरु आहे. आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळेच मंजुरी मिळाल्याचा दावा माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही नेत्यांनी केला आहे. 

या शहराच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गंत 13 कोटी 72 लाख 27 हजार रुपये खर्चाच्या योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली. हे काम नक्की कोणामुळे मंजूर झाले, हे सांगण्यासाठी आढळराव व वळसे पाटील यांनी थेट आपण केलेल्या पत्रव्यवहाराचे पुरावे मंचरकरांसमोर मंडले आहेत. 

शिवसेनेने फ्लेक्‍सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह खासदार आढळराव पाटील यांची छायाचित्रे छापली आहेत. राष्ट्रवादीने त्यांच्या फ्लेक्‍सवर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माजी विधानसभा अध्यक्ष वळसे पाटील यांची छायाचित्रे छापली आहेत. तर दोन्ही पक्षांनी माजी खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचे छायाचित्र आवर्जून छापले आहे. बाणखेले यांना मानणारे नागरिक या शहरात मोठ्या संख्येने असल्याने त्यांनाही आपलेसे करण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला आहे. 

राष्ट्रवादीने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना योजना मंजूर करण्यासंदर्भात पाठवलेल्या पत्राची प्रत फ्लेक्‍स बोर्डावर लावली आहे. त्यासाठी वळसे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ही योजना केंद्र शासनाची नसुन राज्य शासनाची आहे, असा टोला खासदारांना लावला आहे. पाठपुरावा केलेल्या सर्व कागदपत्रांचा पुरावा आमच्याकडे असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. 

योजनेला मंजुरी मिळताच खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांना बरोबर घेऊन तातडीने मंत्रालयात जाऊन पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्‍मामलाल गोयल यांची भेट घेऊन योजना मंजुरीबद्दल अभिनंदन केले आहे. "आम्हीही मुख्यमंत्री तसेच पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच मंत्री लोणीकर यांच्या दालनात अनेकदा बैठक घेतली. राज्यात व केंद्रात शिवसेना- भाजपचे सरकार असुन हे काम आढळराव पाटील यांच्याच प्रयत्नातून मंजूर झाले, असा दावा शिवसेनेने केला आहे. 

आंबेगाव तालुक्‍यात महत्वाची शासकीय कार्यालय घोडेगाव येथे असली तरी राजकीयदृष्ट्या मंचर महत्वाचे मानले जाते. गेल्या पाच- दहा वर्षांपासुन मंचर शहर झपाट्याने वाढत असुन लोकसंख्येने चाळीस हजाराचा टप्पा कधीच पार केला आहे. तालुक्‍यातील प्रत्येक गावातील नागरिकांचा मंचरशी नेहमी संपर्क येत असतो. 

वळसे पाटील व आढळराव पाटील यांची जनसंपर्क कार्यालये येथेच आहेत. येथील ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असली तरी येथील जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणूक असो मंचर शहरात निर्माण होणाऱ्या राजकीय हवेचा परिणाम इतर गावावर होतो. 

त्यामुळे निवडणुकांच्या काळात हे दोनीही राजकीय पक्ष मोठ्या नेत्यांच्या सभा या मंचर शहरात आयोजित करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाते. निवडणुका लांबवर असल्या तरी पाणी योजनेवरून राजकीय वातावरण तापविले आहे. 

मंचर परिसरातून शिवसेनेचे बंडखोर व अपक्ष म्हणून पंचायत समितीवर निवडून आलेले राजाराम बाणखेले यांनी सोशल मिडीयावर या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले. "या दोन्ही नेत्यांना मंचरवासियांनी भरभरून मतदान केले आहे. योजनेला मंजुरी मिळाली असली तरी अजुन निधी मिळायचा आहे. काम अद्याप सुरु व्हायचे आहे. या दोन्ही नेत्यांच्या निवडणुकांना अजुन वेळ असुन तोपर्यत योजनेचे काम सुरु व्हावे. म्हणचे मंचरकर तुमचा जाहीर सत्कार करतील,' अशी खोचक टिप्पणी केली आहे.  

 

संबंधित लेख