Walse-Adhalrao Shadow Wrestling with each other | Sarkarnama

आंबेगाव-शिरुरमध्ये दोन्ही पाटलांची ठरवून चाललीय नुरा कुस्ती

भरत पचंगे
रविवार, 23 सप्टेंबर 2018

जहरी टिका करायची पण मैत्री जपायची..विरोधात बोलायचे पण मित्राच्या विरोधात उमेदवारच तयार होवू द्यायचा नाही.. अशी 'नूरा-कुस्ती’ आंबेगाव-शिरुरच्या राजकीय आखाड्यात सन २००४ पासून सुरू झाली ती आता पुन्हा येवू घातलेल्या लोकसभा-विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर चौथ्यांदा सुरू झाली आहे.

शिक्रापूर : मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शिवाजीराव आढळराव किती निष्क्रीय आहेत, हे सांगत केंदूर (ता.शिरूर) येथे त्यांना हरविण्याची भाषा केली. पण आपल्या पक्षाचा त्यांच्या विरोधात उमेदवार कोण हेच सांगायचे त्यांनी टाळले. अर्थात याच पध्दतीने खासदार आढळराव यांनीही काल पाबळ येथे वळसे पाटलांचा खरपूस समाचार घेत ते ’डोक्यावर पडलेले आमदार’ असल्याचे सांगितले. मात्र हे सांगताना खासदार आढळरावांनीही वळसे पाटलांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार कोण हे सांगायचे टाळले. पर्यायाने पुन्हा एकदा दोघांनीही  अगदी ठरवून दोन्ही मतदार संघातील आपापली उमेदवारी एकतर्फी होईल यासाठीची व्यूहरचना सुरू केली असून हा दोन मित्रांमधील ’नुरा कुस्तीचा’ डाव दोन्ही मतदार संघात चौथ्यांदा टाकायला सुरवात केल्याचीच ही चर्चा आहे.

जहरी टिका करायची पण मैत्री जपायची..विरोधात बोलायचे पण मित्राच्या विरोधात उमेदवारच तयार होवू द्यायचा नाही.. अशी 'नूरा-कुस्ती’ आंबेगाव-शिरुरच्या राजकीय आखाड्यात सन २००४ पासून सुरू झाली ती आता पुन्हा येवू घातलेल्या लोकसभा-विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर चौथ्यांदा सुरू झाली आहे. माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मागील आठवड्यात (दि.१४) केंदूर (ता.शिरूर) येथील सभेत खासदार शिवाजीराव आढळराव किती निष्क्रीय आहेत याचा पाढा वाचला तर आठच दिवसांच्या फरकाने शुक्रवार (दि.२१) खासदार शिवाजीराव आढळराव यांनी वळसे-पाटील यांच्या प्रत्येक वक्तव्याचा खरपूस समाचार घेत जहरी टीका केली. दोघांच्या भाषणातील आश्चर्यचकित करणारे साम्य हे की, दोघांनी आपापल्या निवडणुकांच्या अनुषंगाने व स्वत: उमेदवार असल्याच्या आवेशात भाषणे केली. पण एकमेकांच्या विरोधातील उमेदवारांच्या बाबतीत अवाक्षरही न काढता दोन्ही गावांतून काढता पाय घेतला. 

उत्तम राजकारणी आणि उत्तम उद्योजकाची मैत्री अशी...
खरे तर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव आढळराव यांची मैत्री वळसे पाटलांच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर (सन १९९०) झाली. ही मैत्री दृष्ट लागावी अशीच होती. कारण उत्तम व्यवसाय कसा करावा आणि उत्तम राजकारण कसे करावे अशा दोन्ही क्षेत्रातील दिग्गजांची ही मैत्री होती. हे दोघे खुपच प्रेमात असतानाच भिमाशंकरची उभारणी झाली आणि तेंव्हा खासदार शिवाजीराव आढळराव कारखान्याचे अध्यक्ष राहीले होते. दुर्दैवाने या मैत्रीला ग्रहण लागले आणि आढळरावांनी सन २००४ मध्ये शिवसेनेत जावून थेट लोकसभा गाठली. 

जिवलग मैत्री असल्याने आणि दोघांनाही एकमेकांच्या डाव-प्रतिडावांची पूर्ण माहिती असल्याने दोघांनी एकमेकांना बाधा येईल असे राजकारण कधी केले नसल्याची चर्चा तेव्हापासून ते आजपर्यंत कायम आहे. कारण एकमेकांच्या विरोधात निवडून येणार नाहीत, असे उमेदवार द्यायचे हे दोघांनीही जणू ठरविल्यासारखेच चित्र आंबेगाव-शिरुरच्या आखाड्यात जाणवते. इतिहासात वळून पाहिले तर वळसे पाटलांच्या विरोधात सन २००४, २००९ व २००१४ मध्ये शिवसेनेकडून अ‍ॅड. अविनाश रहाणे, खासदार आढळराव यांच्या पत्नी कल्पना आढळराव-पाटील आणि अरुण गिरे असे उमेदवार उभे केले गेले तर लोकसभेसाठी खासदार आढळराव यांच्या विरोधात सन २००४, २००९ व २०१४ या तीन पंचवार्षिकमध्ये अनुक्रमे अशोक मोहोळ, विलास लांडे व देवदत्त निकम असे उमेदवार उभे  केले गेले. 

लोकसभेत खासदार आढळराव निवडून येतात म्हणजेच त्यांचे विधानसभेचे उमेदवारही यायला हवेतच ना. तसेच विधानसभेलाही दिलीप वळसे पाटील निवडून येतात म्हणजे त्यांच्या पक्षाचे उमेदवार लोकसभेला पडायला नकोच आहेत ना. मात्र, दोन्ही निकाल पाहता आणि गेल्या दोन पंचवार्षिकमधील दोघांची राजकीय वाटचाल पाहता दोघेही आपला 'पूराणा ऋणानुबंध’ जपताहेत असेच चित्र आहे आणि त्याचे प्रत्यंतर नुकतेच केंदूर आणि पाबळच्या सभेच्या दरम्यानही आले. 

पक्षकार्यकर्त्यांचे भविष्य अंधारातच..!
'फक्त साहेबांना निवडून आणायचे..’ या एकाच घोषणेखाली विधासभा आणि लोकसभेची स्वप्न पाहणारी या दोन्ही  मतदार संघातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सर्वच इच्छुक मंडळी राजकारणात आपल्याला भविष्यच नाही असे समजून सध्या मौनात आहेत. कारण अगदी कमी वेळेत वातावरण तयार करुन चांगले आव्हान निर्माण केलेल्या देवदत्त निकम यांना पुढीच चार वर्षात पराभूत उमेदवार म्हणून सहानुभूतीच्या नावाखाली किंवा चांगल्या उमेदीचा भावी उमेदवार म्हणून त्यांना फार काही स्थान दिले गेल्याचे दिसले नाही. 

विलास लांडे यांच्या बाबतीतही तशीच स्थिती. या उलट अ‍ॅड. अविनाश रहाणे यांनाही उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केल्याची एकही घटना पुढील काळात घडली नसल्याचे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सांगतात. तर मागील वेळी ब-यापैकी लढत दिलेले उमेदवार अरुण गिरे तसेच मोठया अपेक्षेने व उमेदीने विधानसभेच्या तयारीने शिवसेनेत आलेल्या शिरुरच्या आक्रमक नेत्या जयश्री पलांडे यांनाही वळसे पाटील यांच्या विरोधातील उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केल्याचा एकही प्रसंग खासदार आढळराव यांच्या कार्यक्रमात पहायला मिळत नाही. पर्यायाने आंबेगावच्या या दोन्ही पाटलांनी लोकसभा-विधानसभेची पाटीलकी आपल्याच मित्राच्या पारड्यात रहावी, अशीच तजवीज दोघांकडूनही होत असल्याचे चित्र असून त्याचे प्रत्यंतर आता येवू घातलेल्या सन २०१९ च्या लोकसभा-विधानसभेच्या तोंडावर येवू लागले आहे एवढेच!   
 

संबंधित लेख