vishvas nangare patils memory | Sarkarnama

'सभापती' नांगरे पाटील कधीही 'विश्वास'च्या शाळेत गेले नाहीत!

संपत मोरे
शनिवार, 8 डिसेंबर 2018


"पैलवानाच्या पोराला कुठं पोलिओ हुतो व्हय?"

पुणे : "माझ्या वडिलांच्या डोक्यात कुस्तीचं वेड होतं. मीही चांगला पैलवान व्हावं, असं त्यांना वाटत होतं. पण मला कुस्तीतलं काही जमलं नाही. मग मी कुस्तीच्या मापाचा पोरगा नाही हे बघून ते नाराज झाले आणि मला त्यांनी शाळेत घातलं. मी पैलवान व्हावं, अशी वडिलांची तीव्र इच्छा मी पूर्ण केली नाही पण मी आयपीएस होऊन त्यांना समाधान दिलं"... या भावना मांडत विश्वास नांगरे पाटील हजारो युवकांना प्रेरणा देत आले आहेत.

नांगरे पाटील यांची जडणघडण कशी झाली, याचे युवकांना अप्रुप आहे. नांगरे पाटील यांनी हा आपला जीवनपट अनेकदा उलगडून दाखवला आहे.

नुकतेच विश्वास यांचे वडिल नारायण नांगरे पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 

सांगली जिल्ह्यातील शिराळा या डोंगरी तालुक्यातील कोकरूड हे नांगरे पाटील यांचे गाव. त्यांचे वडील नारायण पाटील या गावचे सरपंच आणि शिराळा तालुक्याचे सभापती होते. त्यांना कुस्तीची आवड होती. कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर या गावापासून काही अंतरावर. तिथले नामांकित पैलवान नेहमी चर्चेत असायचे. त्यामुळं आपला पोरगा पैलवान व्हावा अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असायची. नांगरे पाटील यांचे वडील तर पैलवान होते, त्यामुळे पैलवानाचा पोरगा पैलवानच झाला पाहिजे असं त्याना वाटायचं. त्यांनी गावातील तालमीत छोट्या विश्वासला कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. पण पोराला पैलवानकी जमेना .मग मात्र हे पोरग कुस्तीच्या मापाच नाही मग काय करायचं? तर जाऊदे शाळेत....अशा रीतीने ते शाळेत गेले. त्यांना जर कुस्तीत गती असती तर नक्कीच त्यांच्या आयुष्याला अजून वेगळं वळण लागले असते. 

कुस्तीबद्दल वडिलांना एवढा विश्वास होता की त्यानी विश्वास यांना पोलिओचा डोस घ्यायला नको असं म्हणत होते. कारण "पैलवानाच्या पोराला कुठं पोलिओ हुतो व्हय?"अस त्यांचं मत.

दुसरी एक आठवण नांगरे पाटील सांगतात,"त्यानी शिराळ्याला शाळेत असताना वडिलांना सांगितलं होतं,"तुम्ही माझ्या शाळेत यायचं नाही." ते तालुक्याचे सभापती होते. अनेकदा शिक्षक त्यांच्याकडे कार्यक्रमसाठी निमंत्रण द्यायला द्यायचे, पण वडील नकार द्यायचे. मुलाला दिलेला शब्द त्यांनी पाळला. ते कधीही शाळेत गेले नाहीत.  

संबंधित लेख