vishal patil will be contest loksabha election | Sarkarnama

सांगलीत संजयकाका विरुद्ध विशाल पाटील असा सामना रंगू शकतो!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

मी विधानसभेसाठीच इच्छुक आहे. पण पक्ष व नेते जी जबाबदारी देतील ती सर्वजण पार पाडू.

सांगली : भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या "दादागिरी'ला कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी खुले आव्हान दिले आहे. संजय पाटील यांना जिल्ह्याचे नेते व्हायचे आहे, मात्र कॉंग्रेस त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत विशाल यांनी संजयकाकांवर वार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय संघर्षात नवी भर पडली आहे. 

विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. त्यांचे बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव करून संजयकाका खासदार झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत संजयकाकांना कॉंग्रेसकडून कोण लढतीत उतरेल हे आजच्या घडीला सांगता येत नाही. अगदी ऐनवेळी संजयकाका विरुद्ध विशाल पाटील असा सामना रंगला तरी आश्‍चर्य वाटायला नको. कदाचित यामुळेच पहिल्यांदा संजयकाकांनी विशाल यांना पाणी योजनेवरून दम दिला होता. आता थोडे थांबून विशाल यांनी संजयकाकांना अंगावर घेतले आहे. 

जिल्हा परिषदेत भाजपच्या बारा सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्याचे पडद्याआडचे सूत्रधार संजयकाका आहेत. ते सूत पकडून विशाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ""खासदार संजय पाटील यांना आता जिल्हाच्या नेतेपदाची स्वप्ने पडत आहेत, मात्र त्यांची दादागिरी कॉंग्रेस खपवून घेणार नाही.

ते म्हणाले, "कॉंग्रेसमधलाच सगळा चिखल भाजपमध्ये गेल्याने तिथे दुसरे काय होणार? एकमेकांवर चिखलफेकच होणार आहे. भाजपमध्येच अस्वस्थता दिसू लागली आहे. चिखलातून कमळ फुलवू असे भाजप नेते सांगत होते. उलट एकमेकांवर चिखलफेक करण्याची सुरुवात भाजपमध्ये लवकरच झाली आहे. भाजपचेच गोपीचंद पडळकर यांनी पक्षात लायकीचे नेते नसल्याचा हल्लाबोल करून तिथल्या नेत्यांची पात्रता दाखवून दिली आहे. शिस्तबद्ध पक्षाचे धिंडवडे निघत आहेत. विकासाच्या गप्पा मारून सत्तेत आलेल्या भाजपकडून भविष्यात भ्रमनिरास होणार आहे. जे जिल्हा परिषदेत घडले ते भविष्यात महापालिकेतही घडेल.''  

लोकसभेच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर ते म्हणाले, "अजून याबाबत पक्षाचे धोरण ठरलेले नाही. मी विधानसभेसाठीच इच्छुक आहे. पण पक्ष व नेते जी जबाबदारी देतील ती सर्वजण पार पाडू. कॉंग्रेसचे दिग्गज नेते आता हयात नसल्याने संजयकाकांना नेतेपदाची स्वप्ने पडू लागली असली तरी त्यांची दादागिरी कॉंग्रेस सहन करणार नाही. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते ठिकठिकाणी दादागिरी करत आहेत. त्यांच्या दादागिरीला जशास तसे उत्तर यापुढे दिले जाईल.''

संबंधित लेख