विश्वजित कदम यांच्या लोकसभा उमेदवारीस वसंतदादा घराण्याचा पाठिंबा!
विश्वजित हे चांगली लढत देतील असे वाटते -विशाल पाटील
सांगली : आमदार विश्वजित कदम यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास वसंतदादा घराण्याचा त्यांना सक्रिय पाठिंबा असेल, असे वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
ते म्हणाले,"कॉंग्रेसकडून उमेदवार कोण असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जो उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील तो आम्हाला मान्य असेल. तथापि विश्वजित हे चांगली लढत देतील असे वाटते.''
ते पुढे म्हणाले, "भाजपकडून युवकांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत बसविण्यामध्ये तरुणांचा मोठा वाटा होता. कोटी नोकऱ्या देतो म्हणून हे सरकार सत्तेवर आले. मात्र नोटाबंदीमुळे एकाच वर्षात तब्बल कितीतरी कोटी लोकांना आपले रोजगार गमवावे लागले. "सीएमआयई' या संस्थेच्या अहवालानुसार लाखो पुरुष आणि महिलांचे रोजगार गेले. युवक वर्गाच्या अपेक्षा भाजपने धुळीस मिळविल्या.