vinod bhosale suicide case | Sarkarnama

खासगी सावकारांच्या जाचाने फलटण तालुक्‍यातील उपसरपंचाची आत्महत्त्या 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

फलटण तालुक्‍यातील होळ गावचे उपसरपंच विनोद बबन भोसले यांनी खासगी सावकारांच्या त्रासास कंटाळून काल (ता. 17) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खुंटे-जिंती रस्त्यावरील जांभळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत श्री.भोसले यांचे सावत्र भाऊ संजय भोसले यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

फलटण : फलटण तालुक्‍यातील होळ गावचे उपसरपंच विनोद बबन भोसले यांनी खासगी सावकारांच्या त्रासास कंटाळून काल (ता. 17) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खुंटे-जिंती रस्त्यावरील जांभळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत श्री. भोसले यांचे सावत्र भाऊ संजय भोसले यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

फलटण पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत संजय भोसले यांनी म्हटले की, फलटण शहरासह तालुक्‍यातील चार व बारामती तालुक्‍यातील एक अशा एकूण पाच खाजगी सावकाराकडून विनोद बबन भोसले यांनी व्याजाने पैसे घेतले होते. त्यांनी घेतलेल्या 11लाख रुपयाच्या मोबदल्यात 26 लाख आठ हजार रुपये देणे होते.

खाजगी सावकारांनी सातत्याने फोन करून पैशासाठी तगादा लावाला होता. तसेच पैसे देण्यासाठी मानसिक त्रास ही दिला जात होता. विनोद भोसले काल (ता 17) सकाळी अकरा वाजता बारामतीला मोटारसायकल (एम एच 11 बी एस 6296) वरुन दवाखान्यात गेले होते. त्यांच्या पत्नीने सायंकाळी सहा वाजता त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला पण श्री. भोसले यांनी मोबाईल उचलला नाही. रात्री साडेसात वाजता पुन्हा त्यांच्या पत्नीने मोबाईलवरून संपर्क केला असता तो बंद केला होता. त्यामुळे पत्नी शुभांगी हिने पतीचा सावत्र भाऊ संजय भोसले व त्यांची पत्नीला संपर्क केला. त्यानंतर हे दोघेही विनोद यांना शोधायला गेले. 

त्यावेळी त्यांना जिंती-खुंटे रस्त्याला खुंटे गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला विनोद यांची मोटार सायकल सापडली. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी विनोदचा शोध घेत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या जांभळाच्या झाडाला विनोद यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांच्या खिशात आणि मोबाईलच्या कव्हरमधील कागदावरील चिठ्ठीत खाजगी सावकाराची नावे व घेतलेल्याला रकमा आणि दिलेल्या रकमा यांचा उल्लेख होता. या चिठ्ठीत रविराज राजाराम घनवट (रा जाधववाडी, रामपार्क अपार्टमेंट) 3 लाख 15 टक्‍क्‍याने 9 लाख 20 हजार, बाळू मुकूंदा कोळेकर (रा. कोर्हाळे खुर्द, ता. बारामती) तीन लाख 10 टक्‍क्‍याने 7 लाख रुपये, अनिल चांदगुडे (जिंती नाका, फलटण) दीड लाखाचे तीन लाख रुपये, रविंद्र हरिभाऊ काकडे (रा, मंगळवार पेठ, फलटण) दोन लाखाचे तीन लाख 88 हजार, विनोद हणमंत चव्हाण (रा. शेरेवाडी, ढवळ) दोन लाखाचे तीन लाख असे आढळून आले आहे. तसेच रविंद्र काकडे यांचा मुलगा सतत फोन करून त्रास देत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. खाजगी सावकारांच्या सततच्या तगाद्याला कंटाळून भावाने आत्महत्या केली संजय भोसले यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

संबंधित लेख