VINAYAK METE TRAVELS ON BULLET | Sarkarnama

बीड शहरातल्या खड्ड्यांच्या अनुभवासाठी मेटेंची बुलेट सैर

दत्ता देशमुख
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मेटेंनी आतापासूनच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. मेटे जिल्ह्यातील विकासकामांसाठी पाठपुरावा करतात हे लक्षात आल्याने मधल्या काळातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक आणि परवा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पक्षाने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांचा हुरूप आणखी वाढला आहे.

बीड : कायम मुंबईकर, अशी टीका झेलणारे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आता बीड मतदारसंघात लक्ष घातले आहे. त्यानुसार बीड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा फिल घेण्यासाठी आज (ता. २५ आॅक्टोबर) बुलेट सैर केली.
 
आमदार विनायक मेटे यांची ऊठबस नेहमी बड्या राजकीय नेत्यांसोबत राहिली. त्यामुळे मुंबईचे नेते अशी ओळख निर्माण झाल्याने त्यांना बीडमध्ये जम बसवता आला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही त्यांना काठावरचा पराभव पत्करावा लागला. ही चूक त्यांना आता उमगली आहे. त्यामुळेच मेटे आता बीडच्या रस्त्यावर फिरू लागले आहेत.

बीड शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. याबाबत लोकांची नेहमीच ओरड असते. त्यामुळे हे खड्डे पाहण्यासाठी त्यांनी बुलेटवरून सैर केली. तब्बल दोन तास ते शहरातील रस्त्यांवरून फिरत होते. सोबत ३०-३५ गाड्यांचा ताफाही होता. रस्त्यावरील खड्डे, जागोजागी कचऱ्याचे ढिग पाहून त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर टीका केली. अशा परिस्थितीत येथील जनता राहते, तिचे कौतुकच केले पाहिजे, असेही सर्टिफिकेट त्यांनी दिले. या खड्ड्यांची सैर करून मेटे यांचे मणके खिळखिळे झाले असतील, पण मतदारसंघाची बांधणी या खिळखिळ्या मणक्यांमुळे झाल्याची प्रतिक्रियाही व्यक्त झाली.   

विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मेटेंनी आतापासूनच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. मेटे जिल्ह्यातील विकासकामांसाठी पाठपुरावा करतात हे लक्षात आल्याने मधल्या काळातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक आणि परवा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पक्षाने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांचा हुरूप आणखी वाढला आहे.
 
बाह्यवळण रस्ता लवकर व्हावा, बिंदुसरा नदीवरील पर्यायी पुलाची दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. नेत्यांमधील या स्पर्धेमुळे बीड शहराची कामे किमान मार्गी तरी लागतील, अशी जनतेची अपेक्षा आहे.

संबंधित लेख