vinayak mete takes issue of sugarcane workers, criticises sharad pawar and pankaja munde | Sarkarnama

मेळाव्यातून मेटेंकडून दिवंगत मुंडेंची स्तुती; शरद पवार, पंकजा मुंडेंवर टीका

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

ऊसतोड मजूरांच्या प्रश्नावर सरकारला वाकविण्याची आणि लोळविण्याची ताकद केवळ दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यामध्ये होती. शरद पवार यांनी सर्वच घटकांसाठी काम केलेले आहे. त्यांनी आता ऊसतोड मजूरांचे प्रश्न सोडविण्यासाठीही पुढाकार घ्यावा. ऊसतोड मजूरांचे प्रश्न हे कोणाचे आंदन नाही. मजूरांच्या प्रश्नांवर फक्त राजकारण केले जात आहे. 
- विनायक मेटे

बीड : ऊसतोड मजूर आणि मुकादामांच्या प्रश्नावर सरकारला वाकवण्याची आणि लोळविण्याची ताकद केवळ दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यात होती. नंतर मात्र हा घटक केवळ राजकारणासाठी वापरला जात आहे. जसा काही पक्ष एखाद्या नेत्याला जिल्हा किंवा मतदार संघ आंदन देतात तसे हा प्रश्न कोणी आपल्यासाठी आंदन समजू नये, असे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे म्हणाले. 

शरद पवार यांनी सर्वच घटकांसाठी काम केलेले आहे. त्यांनी आता ऊसतोड मजूरांचे प्रश्न सोडविण्यासाठीही पुढाकार घ्यावा. केवळ कारखानदारांचे नेते होऊ नये तर मजूरांचे नेतेही व्हावे. मजूरांच्या प्रश्नांबाबत कारखानदारांना सुचना द्याव्यात असे आवाहन त्यांनी शरद पवार यांना केले. 

पाडळशिंगी (ता. गेवराई) येथे शुक्रवारी शिवसंग्रामचा ऊसतोड मजूर मेळावा झाला. मेळाव्यात श्री. मेटे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंवर स्तुती, तर शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. 
 
ऊसतोड मजूर आणि मुकादमांच्या साठ वर्षांपासूनच्या प्रश्नांत काहीच ठोस उपाय निघालेले नाहीत. या प्रश्नासाठी झगडणारे आणि संघर्ष करणारे दिवंगत लोकनेते गेल्यानंतर ह्या प्रश्नावर केवळ राजकारण झाले असे मेटे म्हणाले. त्यानंतर या प्रश्नाचा केवळ राजकारण म्हणून होत आहे. या घटकांचे प्रश्न सुटले आणि मजूरांची मुले शिकून मोठे झाले तर आपल्या राजकारणाचे काय, अशी चिंता या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांना असल्याची टिका त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांच्यावर केली. 

आपण मेळावा घेत असल्याने अनेकांच्या पोटात दुखत असले तरी आता त्यांना पोटदुखीसाठी शिवसंग्रामच्या ‘जमाल गोटा’ ने ईलाज होईल. तुम्ही नाकर्ते असल्यानेच मला या प्रश्नात लक्ष घालावं लागतय. मजूरांच्या प्रश्नांवर सरकारला वाकविण्याची आणि लोळविण्याची ताकद दिवंगत मुंडेंमध्ये होती. त्याच पद्धतीने आपणही या घटकासाठी काम करु असे विनायक मेटे म्हणाले. आजच्या मेळाव्याला उपस्थितांना कोणी दमबाजी केली तर तिथल्याच बोरी आणि तिथल्याच बाभळी असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित लेख