Vinayak Mete should not deceive sugarcane labors | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

 मराठा समाजाला झुलवत ठेवणा-या मेटेंनी ऊसतोड मजूरांचे तरी वाटोळे करू नये  

दत्ता  देशमुख 
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

विनायक मेटे यांनी उसतोड कामगारांचा मेळावा घेऊन शिवसंग्राम ऊसतोड कामगार संघटनेची घोषणा करून पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. आता या टीकेची पडसाद उमटू लागले असून विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्षाचा भडका उडेल अशी परिस्थिती  निर्माण झाली आहे .

बीड : " आयुष्यात कधीही हातात कोयता न घेणारे आमदार विनायक मेटे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर इतके दिवस कुठे होते? त्यांना याची आताच कशी आठवण आली?   मराठा समाजाला झुलवत ठेवणा-या मेटेंनी ऊसतोड मजूरांचे तरी वाटोळे करू नये," अशी टीका ऊसतोड कामगार संघटनेचे गोरक्ष रसाळ यांनी केली आहे. 

लोकनेते मुंडे यांचा फोटो वापरण्याचा तुम्हाला कसलाही नैतिक अधिकार नाही.  विनायक मेटे आता कामगारांचे नेते म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. ज्या समाजात ते जन्मले आहेत, त्यांचा एकतरी प्रश्न त्यांनी सोडवला का? केवळ समाजाचे नांव वापरून राजकारण करण्यापलिकडे त्यांनी कांही केले नाही असेही रसाळ यांनी पत्रकात म्हटले आहे. 

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि शिवसंग्रामचे संस्थापक   आमदार विनायक मेटे यांनी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेवून पंकजा मुंडे यांच्यावर  नाव न घेता टीका केली. हा प्रश्न म्हणजे कोणी आंदण समजू नये, तुम्ही नाकर्ते आहात म्हणून मला या प्रश्नात लक्ष घालावे लागते असे विविध आरोप केले होते. विनायक मेटेंच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद बीड जिल्ह्यात उमटू लागले आहेत . पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी विनायक मेटे यांच्यावर जोरदार टीका करणारी निवेदने दिली आहेत . 

 "मंत्री पंकजा मुंडे  प्रथम ऊसतोड कामगारांच्या नेत्या आहेत त्यानंतर त्या शेतकरी आणि मग कारखानदार आहेत. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात ऊसतोड मजूरांचा  पंकजा मुंडे यांच्यावरच विश्वास आहे व  त्यांचा आधार वाटतो," असे पत्रक भाजपचे माजी आमदार केशव आंधळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

ते आपल्या निवेदनात म्हणतात ," लोकनेते गोपीनाथराव मुंडे आयुष्यभर मजूरांच्या प्रश्नांवर लढले, त्यांना न्याय मिळवून दिला ते सुध्दा अगोदर मजूरांचे नेते व मग कारखानदार होते, आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून  पंकजा मुंडे लढत आहेत. ऊसतोड कामगारांचे नेतेपद हे त्यांनी मंत्री पदापेक्षाही मोठे मानले आहे.  सर्व संघटनांनी एकत्र येवून त्यांचा लवाद मान्य केला आहे असे असताना हा लवाद बेकायदेशीर आहे असे मेटेंचे म्हणणे हास्यास्पद आहे.   

 " लवादाच्या माध्यमातून ऊसतोड मजूरांना वीस टक्के वाढ देण्याबरोबरच विमा योजना, पाल्यांसाठी हंगामी वसतिगृह आदी अनेक प्रश्न त्यांनी सोडवले. तीन वर्षाचा करार होता आता तो पांच वर्षाचा झाला. हा घटकपंकजा मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे त्यामुळे नाटकं करून मजूरांची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा डाव कधीही यशस्वी होणार नाही ,"असे आंधळे यांनी म्हटले आहे. 

 

संबंधित लेख