Vinayak Mete leaves meeting in 5 minutes, Pankaja Munde ignores him | Sarkarnama

विनायक मेटे पाच मिनिटांत बैठकीतून  उठून गेले ,पंकजा मुंडेंनी  दुर्लक्ष केले 

दत्ता देशमुख 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

बैठक सुरु झाल्यानंतर १५ मिनीटांनी विनायक मेटे यांचे आगमन झाले. पण, व्यासपीठावरील सर्व खुर्च्या पॅक झालेल्या होत्या. खुर्ची रिकामी नसल्याने मेटे सदस्यांमध्ये जाऊन बसले . त्यानंतर मेटेंना  भिमराव धोंडे व सुरेश धस यांनी व्यासपीठाकडे बोलावून घेतले. पण राज्य मंत्र्यांचा दर्जा असलेल्या विनायक मेटेंसाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खुर्ची राखीव का नव्हती ? याची चर्चा रंगली आहे .

बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत  मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांच्या रांगेतील एकही खुर्ची रिकामी नसल्याने आमदार विनायक मेटे सदस्यांमध्ये बसले. त्यांना भाजप आमदारांनी वरती बोलावून घेत खुर्चीची सोय केली आणि बसवलेही. पण झालेला प्रकार म्हणजे 'बुंद से गयी वो हौद से नही आती', असे मानून बहुदा विनायक   मेटे पाच मिनिटांतच बैठकीतून निघून गेले. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी हा सर्वप्रकार दुर्लक्षित केला हेच यातील खरे इंगीत आहे. या नव्या मानापमान नाट्याची पुन्हा एकदा बीडच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. 

भाजपची सत्ता आल्यानंतर साधारण साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीवेळी आमदार विनायक मेटे यांना समितीच्या अध्यक्षा आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या शेजारची खुर्ची होती. विशेष म्हणजे त्यावेळी विधानसभेला पराभव आणि परिषदेची त्यांची आमदारकी अध्यक्षांनी रद्द केलेली असल्याने विनायक मेटे आमदारही नव्हते. तरीही त्यांना सुरुवातीला भाजपमध्ये विशेषत: पंकजा मुंडेंकडे ‘मानाचे पान’ होते. पण, पुढे या दोघांत अंतर पडले. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत जवळ आलेले मेटे - मुंडे यांच्यात पुन्हा राजकीय दुरावा निर्माण झाला आहे. 

दरम्यान, सोमवारी जिल्हा नियोजन समितीमार्फत हाती घेतलेल्या ३१५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. व्यासपीठावर पंकजा मुंडेंसह भाजप आमदार भिमराव धोंडे, सुरेश धस, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, आर. टी. देशमुख, राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यासह व अधिकारी बसलेले होते. बैठकीला आमदार मेटे १५ मिनिटांनी पोचले. 

व्यासपीठावरील रांगेत रिकामी खुर्ची नसल्याने मेटे थेट सदस्यांमध्ये जाऊन बसले. भाजप आमदार भिमराव धोंडे व सुरेश धस यांनी मेटेंना आग्रहाने वरती बोलावले. ‘पण तिथे खुर्ची नाही इथेच बसतो’ असे मेटे म्हणाले. यावेळात शिपायाने तत्काळ खुर्चीची व्यवस्था केली. मेटे वरती आल्यानंतर आमदार लक्ष्मण पवार यांनी स्व:तची खुर्ची सोडत बसण्याची विनंती केली. पण, नव्याने आणलेल्या खुर्चीवर मेटे विराजमान झाले.

मात्र, आपल्यासाठी  पहिल्या रांगेत खुर्ची राखीव नसावी याची नाराजी असावी . शिवाय  हा सर्व प्रकार सुरु असताना पंकजा मुंडेंनी सपशेल केलेले दुर्लक्ष याची सल मेटेंच्या मनात  असावी . कारण काहीही असो , पाच मिनिटांतच मेटेंनी परतीचा रस्ता धरला. मात्र, यानंतर मानापमान आणि पंकजा मुंडे व विनायक मेटे यांच्यातील दुराव्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख