Vinayak Mete eyeing for Pankaja Munde's vote bank | Sarkarnama

विनायक मेटे यांच्या हातात कोयता आणि नजर पंकजा मुंडेंच्या व्होट बँकेवर !

दत्ता देशमुख 
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

जिल्ह्यात पाच लाखांवर ऊसतोड मजूर आहेत. ऊसतोड मजूर आणि मुकादम ही दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकारणाचा पाया राहिलेला आहे. आता हा घटक पंकजा मुंडे यांच्यामागे आहे. पण, आता विनायक मेटे यांनीही मजूर व मुकादमांचा मेळावा घेतला.अचानक हा मेळावा म्हणजे पंकजा मुंडे यांच्या वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. 

बीड : जिल्ह्यात आणि राज्यात ऊसतोड मजूर आणि मुकादमांची ताकद मोठी आहे. राजकीय पाया भक्कम करायचा तर हा घटक मागे असणे गरजेचे असल्याचे हेरून शिवस्मारक समिती अध्यक्ष आणि शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनीही या संघटनेचा मेळावा घेतला. 

दरम्यान, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय वाटचालीत आणि यशात ऊसतोड मजूर आणि मुकादम हा घटक महत्वाचा राहिला. गोपीनाथ  मुंडे यांनी या घटकांच्या प्रश्नाला कायम वाचा फोडून संघर्ष केला. त्यांच्या पश्चात भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे या घटकांचे नेतृत्व आहे. मजुरी व कमिशन वाढवून मिळण्यासाठी सध्या मजूर आणि मुकादमांचा संप सुरु असून महिन्यापूर्वी मेळावा घेतला. 

त्यात पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचे राजकीय संबंध पाहता विनायक मेटे यांनी घेतलेल्या मेळाव्याला राजकीय महत्व आहे. पंकजा मुंडे यांनी अलीकडे विनायक मेटे यांच्या एका समर्थकाला स्वतःच्या गोटात ओढल्याच्या घटनेनंतर अचानक हा मेळावा म्हणजे पंकजा मुंडे यांच्या वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. 

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात पंकजा मुंडे यांच्या गेवराई दौऱ्यात शिवसेनेच्या बदमराव पंडित यांना मान मिळाल्याने भाजप आमदार लक्ष्मण पवार समर्थक नाराज झाले होते. या मेळाव्याला भाजप पदाधिकारी हजर असल्याने पवारांनीही नेतृत्वाला अप्रत्यक्ष संदेश दिला असल्याचेही बोलले जात आहे. गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे झालेल्या मेळाव्याला विनायक मेटे यांना अपेक्षित गर्दी तर झालीच शिवाय बंजारा समाजातील मजूर आणि मुकादमांची मोठी संख्या होती. 

मेटेंनी केले  मुंडेंच्या फोटोचे पूजन

ऊसतोड मजूर आणि मुकादम कायम दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पाठीशी राहिला. तर, या घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिवंगत मुंडे यांनी कायम संघर्ष केला. मेटे यांच्या मेळाव्यात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांसोबत दिवंगत गोपीनाथराव मंडई यांचीही प्रतिमा होती. त्यांचेही पूजन केले गेले. मेळाव्याच्या विविध बॅनर आणि पोस्टरवर देखील दिवंगत मुंडे यांचे छायाचित्र होते. 
 

संबंधित लेख