शिवस्मारकाची जागा बदला म्हणणारेच छत्रपतींचे खरे विरोधक - विनायक मेटे

शिवस्मारकाची जागा बदला म्हणणारेच छत्रपतींचे खरे विरोधक - विनायक मेटे

बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकासाठी 25 वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याला यश आले आणि कामाची निविदा निघून काम सुरु होण्याच्या दिवशीच दुर्दैवी घटना घडली. मात्र, यानंतर आपल्याला टार्गेट करुन अनेक प्रश्न उपस्थित केले. याच निमित्ताने शिवस्मारकाची जागा बदलण्याची मागणीही काहींनी केली. परंतु, जागा बदला म्हणणारेच छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विरोधक असल्याचा घणाघात शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला. 

गेल्या वर्षी शिवस्मारकाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपुजन झाले. तर 24 ऑक्‍टोबरला शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार होती. यावेळी एक बोट खडकावर आदळून झालेल्या अपघातात शिवसंग्रामच्या सिद्धेश पवार या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. यानंतर अनेक चर्चा आणि प्रश्न उपस्थित झाले. यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया आणि माहिती दिली. मात्र, यावर स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी कुठलीही प्रतिक्रीया दिली नव्हती. 

मात्र, दिवाळी स्नेहमिलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मेटे यांनी प्रथमच जाहीर भाष्य केले. त्यांनी यावेळी सर्व हकिकतही कथन केली. 25 वर्षे अनेकांनी लढा दिल्यानंतर शिवस्मारक उभारणीला मुर्त स्वरुप आले. पाठपुरावा करुन सर्व परवानग्या मिळविल्या. या सोहळ्याला येण्यासाठी अनेकांनी विनंती केली. मात्र, आम्हीच नाही म्हणालो होतो. मात्र, इतिहासात नोंद होणारा क्षण टिपण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना यावे वाटत होतं. म्हणून सुरुवातीला दोन बोटींनी जायचे नियोजन चार बोटींवर गेले. सर्वजण व्यवस्थित जात असताना एक बोट चालकाने वेगळ्या मार्गाने आणि चुकीच्या ठिकाणाहून नेल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या बोटीत शिवसंग्रामचे राज्यातील सर्व प्रमुख कार्यकते व नेते होते. 

आपणही त्याच बोटीत बसणार होतो. पण, अधिकाऱ्यांसोबत दुसऱ्या बोटीत जावे लागले. मात्र, ही दुर्दैवी घटना घडली असली तरी घटनेनंतर अवघ्या 13 मिनीटांत मुख्यमंत्री, राज्यपाल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, हेलिकॉप्टर, चॉपरसह जयंतरावांसारख्या खासगी यंत्रणाही कामाला लागल्या. त्यामुळे घटनेत मृत पावलेल्या पवार यांचे दु:ख असले तरी इतरांना वाचविता आल्याचे समाधान असल्याचे विनायक मेटे म्हणाले. 

मात्र, यानंतर या कार्यक्रमाची गरज होती का, हा कार्यक्रम सरकारचा होता कि शिवसंग्रामचा अशा अनेक चर्चा घडवून आपल्याला टार्गेट केलं. अनेकांनी देव पाण्यात ठेवले. पण, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले. यानिमित्ताने अनेकांनी शिवस्मारकाची जागा बदलण्याची मागणी केली आहे. मात्र, जागा बदला म्हणणारेच खरे छत्रपतींचे विरोधक असल्याचे विनायक मेटे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com