vinaya aundhkar appointed as rahimatpur co | Sarkarnama

कऱ्हाडच्या भाजप नेत्यांना फेस आणणारे औंधकर आता रहिमतपूरचे CO

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

विनायक औंधकर यांनी कऱ्हाडमध्ये कार्यरत असताना बेकायदेशीर गोष्टींना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ही कार्यपद्धती सत्ताधारी भाजपच्या नेतेमंडळींना रुचली नाही.त्यांनी औंधकर यांच्या बदलीचा चंग बांधला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सत्तेचा वापर करुन त्यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते औंधकर यांच्या कामाच्या बाजूने उभे होते. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी प्रचंड ताकद लावूनही औंधकर यांची बदली लगेच झाली नव्हती. ही बदली करत असताना इच्छुक नेत्यांना अक्षरश: फेस आला होता. 

सातारा : कऱ्हाडचे बहुचर्चित माजी मुख्याधिकारी विनायक औंधकर पुन्हा सातारा जिल्ह्यात रुजू झाले आहेत. आज त्यांनी रहिमतपूर पालिकेत पदभार स्वीकारला. तरुण तडफदार अधिकारी म्हणून औंधकर यांची ओळख आहे.रहिमतपूर पालिकेतील प्रशासकीय कारभाराची घडी बसविण्याचे त्यांच्या पुढे आव्हान आहे. 

रहिमतपूर पालिकेतील मुख्याधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते. या रिक्त जागेवर जामखेड (जि. नगर) येथून औंधकर यांची नेमणूक केली आहे. जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2017 या काळात त्यांनी कऱ्हाडला काम पाहिले होते. या कालावधीत त्यांच्या बदलीसाठी नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे औंधकर चांगलेच चर्चेत राहिले होते. जामखेडवरून औंधकर यांची पुन्हा सातारा जिल्ह्यात बदली झाली आहे. आजच त्यांनी रहिमतपूर पालिकेत पदभार स्वीकारला. "सकारात्मक कामांना गती देण्यावर आपला भर असले,' असे त्यांनी सांगितले. 

 

संबंधित लेख