vilasrao`s presence of mind | Sarkarnama

समयसूचक विलासराव! 

संजय मिस्किन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

विलासराव देशमुखांचे हजरजबाबीपणाचे, त्यांच्या समयसूचकतेचे अनेक किस्से आजही आठवले जातात. कठीण प्रसंगात तणाव हलका कसा करावा, कसोटीच्या क्षणी काय बोलावे, याचा वस्तुपाठ म्हणजे विलासराव देशमुख होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे काही अनुभव.

विलासराव देशमुख जितकं रूबाबदार तितकचं कार्यकुशल व समयसुचक व्यक्तिमत्व...! विलासरावांच्या सानिध्यात जो येईल तो सगळा तणावं विसरून जाणार याची खात्री. मुंबईवरील हल्ल्यानंतर विलासरावांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यावेळी ते पहिल्यांदा तणावात दिसले. पण त्याच वेळी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नसल्यानं बंडाचे निशाण फडकावले. राणे यांनी अत्यंत आक्रमक होवून कांग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. त्यामुळे राणे बंड करतील असेच चित्र होते.

 
काही मोजक्या पत्रकारांनी विलासरावांना गाठले व नारायण राणे यांनी बंड केले तर काय परिणाम होईल असे विचारले. 
मानेवरील केसांतून हात फिरवण्याची सवय विलासरावांना होती. त्या स्टाईलमधे इतक्या तणावाच्या वातावरणातही त्यांनी काॅंग्रेस संस्कृतीचे उदाहरण देत तणाव निवळला. विलासराव म्हणाले, ‘ काॅग्रेस एक पक्ष असला तरी त्याची कार्यपद्धती मिरवणुकीसारखी आहे. मिरवणूक आपल्या पद्धतीने वाजत गाजत चालत असते. लोक समोर नाचत असतात. बाहेरून बघणारे बघत असतात. ज्याला जसे नाचायचे तसे व जेवढ्या वेळ नाचायचेयं तेवढ्या वेळ नाचत असतात. ज्यांना बाहेरून बघायचेयं ते बघत असतात.  ज्यांना सहभागी व्हायचेच ते सहभागी होत असतात. मिरवणूक काय कोणामुळं थांबत नाही. ती त्याच जोमात व जोशात चालत असते. त्यामुळे कोण आलं काय अन् कोण गेलं काय काॅग्रेसला फार फरक पडत नाही.``

विलासरावांच्या या उदाहरणाने सर्वच मनमुराद हसले व काॅग्रेसमधे राणे यांच्या बंडाचे फार महत्व नसल्याचे विलासरावांनी अधोरेखित केले. कोणत्याही नकारात्मक सुराला सकारात्मकतेत बदलण्याचे विलासरावांचे कसब निर्विवाद होते.  मंत्रालयाच्या समोरील गांधी भवन हे काॅंग्रेसचं मुख्यालय. ते जुनं झालं होतं. वाळवी लागली होती. पावसाळ्यात तर ते गळायला होतं.  तर राष्ट्रवादीनं नवं अलिशान कार्यालय उभारलं होतं. त्यावेळी एका पत्रकाराने विलासरावांना थेट विचारलं. तुम्ही मुख्यमंत्री आहात अन् तिकडं काॅग्रेस कार्यालयाला वाळवी व गळती लागलेली आहे.

 
या कठीण प्रश्नातूनही विलासरावांनी अगदी समयसुचकपणे सुटका केली. ते म्हणाले, ‘ काॅग्रेस हा जनमानसांत जावून काम करणारा जनतेचा पक्ष आहे. कार्यालयात बसून टेबलवर्क करणारा नाही...! विलासरावांच्या या उत्तरानं सर्वांनाच हास्यात बुडवलं होतं.

संबंधित लेख