विलासराव आजही रिचेबल...! 

विलासराव आजही रिचेबल...! 

मुंबई : राजकारणातलं एक भारदस्त व जनसंपर्कातलं निर्विवाद व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव देशमुख...! लोकांशी संवाद साधणं.. प्रत्येकाशी मवाळ व मिश्‍किलपणे बोलणं ही विलासरावांची खासियतचं नव्हे तर दैवी देणगी होती..! 

विलासराव अन मोबाईल हे अगदी अतुट नातं. मुख्यमंत्री असतानाही खिशातला मोबाईल वाजला की कुठेही असले तरी ते फोन घेणार व अगदी अदबीनं मी विलासराव देशमुख बोलतोय, बोला कोण ? अशी विचारणा करणार. साध्या आमदाराचा फोन पण पीए उचलतो अशी मानसिकता झालेल्या सामान्य जनतेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मोबाईल घेतो याचं अप्रुप वाटे. त्यामुळं कोणीही त्यांना थेट मोबाईलवर संपर्क करत असे. कधी कधी तर खरचं विलासराव फोन घेतात काय हे पाहण्यासाठी गावखेड्यातील मुलं विनाकारण फोन करून पडताळणी करत. काय काम आहे असं विचारलं की, काही नाही हा विलासराव देशमुखांचाच नंबरयं का हे पहायचं होतं असं कारण देत. अशावेळीही विलासराव न चिडता ,हा विलासराव देशमुखांचाच नंबर आहे. अन मी विलासरावचं बोलतोयं.असे सांगत. 

कुणाचा फोन कामाच्या व्यापात घेता आला नाही तर ते निवांत झाल्यावर आलेल्या अनोळखी फोन वरही परत कॉलबॅक करत. मी महाराष्ट्रचा मुख्यमंत्री आहे. अन राज्यातल्या कोणत्याही व्यक्तीचं काहीही काम असू शकतं. अडचण असू शकते. त्यामुळं मी मोबाईलवर येणारा प्रत्येक कॉल टाळू शकत नाही. इतक्‍या प्रांजळ व उदात्त मनानं विलासराव सांगत. 

त्यामुळं विलासरावांचा 9821125000 हा नंबर कधीच बंद नसे. आज विलासराव यांना जावून सहा वर्षे लोटली. पण त्यांचा हा मोबाईल क्रमांक ज्याच्याकडे असेल त्याने लिस्ट मधून डिलीट केला नाही असे शेकडोजण आहेत. कारण याच नंबरवर आजही विलासराव रिचेबल असल्याची साक्ष मिळते. विलासरावांचा हा नंबर डायल केला की त्यांची भाषणं ऐकायला येतात. त्यांचा तो आवाज ऐकून चाहते आजही विलासरावांच्या आठवणीनं व्याकूळ होतात. भावूक होतात. 

विलासरावांच्या आठवणीत मग्न होवून किस्से, त्याचे व्यक्तिमत्व याबाबत चर्चा करतात. विलासरावांचे पुत्र आमदार अमित देशमुख व त्याच्या सहकार्यांनी विलासरावांचे हे जनतेशी असलेलं मोबाईलचं अतुट नातं आजही जोपासलं आहे. विलासरावांचा मोबाईल आजही रिचेबल ठेवून हे भावुक बंध घट्ट केले आहेत.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com