vilasrao deshmukhs styasaibaba story by dilip patil | Sarkarnama

म्हणून दिलीप पाटलांना सत्यसाईबाबांचा भक्‍त प्रसन्न झाला नाही! 

संपत मोरे 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मी त्यांना नेहमी भेटायचो. दिल्लीत जेव्हा ते अवजड उदयोग मंत्री होते तेव्हा त्यांना मी भेटायला गेलो तर त्यांच्या बंगल्यावर गर्दी नव्हती. दिवाणखान्यात एकटेच साहेब बसलेले. मला पाहून ते आनंदित झाले. दिलखुलास हसले. बोलण्याच्या ओघात मला म्हणाले, पाटील मी माणसांच्या गराड्यात वावरणारा माणूस. इथली शांतता त्रासदायक वाटते. करमत नाही. साहेबांचे ते बोलणे ऐकून मलाही उदास वाटले. खरतर साहेबाना माणसांच्या गर्दीत बघायची सवय होती. पण इथे साहेब मात्र एकटे होते . त्यानंतर काही दिवसांनी साहेब गेले. त्यांची आणि माझी शेवटची भेट मला नेहमी आठवत राहते. ते नाहीत हे मनाला पटत नाही . - दिलीप पाटील 
 

दिवंगत नेते, विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना आलेले अनुभव सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी "सरकारनामा'शी बोलताना कथन केले. 

दिलीप पाटील यांनी त्यांच्या एका प्रकल्पाचे नाव सत्यसाई असं ठेवलं होतं. हेतू हा की विलासराव देशमुख हे सत्यसाईबाबांचे भक्त असल्याने त्यांचे नाव पाहून लगेच मंजुरी मिळेल. पण विलासरावांच्या काळात मंजुरी मिळाली नाही. मात्र नंतर तो प्रकल्प उभा राहिला. दिलीप पाटील आणि विलासराव यांचे संबंध जिव्हाळ्याचे असल्याने त्यांनी या प्रकल्पाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलावले. 

या कार्यक्रमात विलासरावांनी जाहीरपणे त्यांना मिश्‍कीलपणे चिमटा काढला ते म्हणाले, दिलीप पाटील यांनी त्यांच्या संस्थेला सत्यसाई बाबांचं नाव दिलं, पण त्यांचा हेतू बाबांचा भक्त प्रसन्न व्हावा हा होता. त्यांनी स्वार्थी हेतूने नाव दिल्यानेच त्यांचे काम रखडले. त्यांच्यावर बाबांच्या भक्ताची मेहरबानी झाली नाही. 

विलासराव जाहीर सभेत असे बोलले पण त्यांचे बोलणे सहज होते, त्यांच्यावर टीका करणे हा हेतू नव्हता तर अतिशय विनोदी शैलीत त्यांना चिमटा काढायचा होता. आणि तो त्यांनी काढलाच आणि खुद्द दिलीप पाटील यांच्या परिसरात ते सभा गाजवून गेले. 

 

संबंधित लेख