Vilasrao Deshmukh was visionary leader | Sarkarnama

विलासराव -कार्यकर्त्यांची पारख असलेला नेता !

उत्तम कुटे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

आपल्या कार्यकर्त्याला ते अचूक ओळखण्याची त्यांची हातोटी होती. एवढेच नाही,तर ते त्याची जाणही ठेवत होते.

पिंपरीः "ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अ्ध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर कार्यकर्त्यांची उत्तम पारख असलेले स्व. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. कितीही मोठ्या गराड्यातील आपल्या कार्यकर्त्याला ते अचूक ओळखण्याची त्यांची हातोटी होती. एवढेच नाही,तर ते त्याची जाणही ठेवत होते," असा विलासरावांच्या आठवणींचा जागर त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त कॉंग्रसचे माजी शहराध्यक्ष व शहरातील ज्येष्ठ राजकारणी भाऊसाहेब भोर्ईर यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना केला.

भाऊसाहेब भोर्ईर विलासरावांच्या निधनापर्यंत सलग नऊ वर्षे दिवाळीला शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी-चिंचवडहून साडे  तीनशे किलोमीटर दूर असलेल्या बाभूळगावला (विलासरावांचे लातूर जिल्ह्यातील गाव) जात होते.

विलासराव मुख्यमंत्री नसतानाही पहिली तीन वर्षे ते दिवाळीला गेले. तेव्हा विलासरावांनी पुष्पगुच्छ स्वीकारीत नमस्कार केला होता. मात्र, चौथ्या वर्षीही साडे तीनशे किलोमीटरवरून गेल्याने त्यांना त्याचे कौतूक वाटले आणि त्यांनी आस्थेने चौकशी केली, अशी आठवण भाऊसाहेबांनी सांगितली. नंतरही त्यांचा हा परिपाठ चालूच होता. विलासराव मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते वर्षाऐवजी बाभूळगावलाच जात होते. अगदी विलासराव गेले त्या वर्षापर्यंत ही दिवाळी भेट सुरु होती.

भोईर म्हणाले, "विलासराव हे सुसंस्कत आणि लोकाभिमुख राजकारणी होते.  या नेत्याला शास्त्रीय गायनाचे उत्तम ज्ञान होते. तबला वाद्याचीही तेवढी जाण होती. दिलेला शब्द ते पाळत होते. त्यांना कार्यकर्त्यांची चांगली पारख होती. त्यांचे नेटवर्क त्यांच्याकडे होते. दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या रात्री मी बाभूळगावला निघत असे. पाडव्याला त्यांना शुभेच्छा म्हणून परतत होतो.त्यावेळी गराड्यातूनही ते भोईर असे हाक मारीत असत. त्या आठवणीने आजही मन भरून येते."

 मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेकदा काही काम असल्यास सांगत जा, असे बजावले होते. मात्र, त्यांच्याकडे कधी काम घेऊन गेलो नाही असे सांगून भाऊसाहेब भोर्ईर पुढे म्हणाले ," त्याची कदर म्हणून त्यांनी मला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य केले. प्राधिकरणाचे अध्यक्षही करण्याचा त्यांचा मानस होता. पण कुठे माशी शिंकली कळले नाही. अध्यक्ष झालो नाही. त्यानंतर प्राधिकरणाला अद्याप पावेतो अध्यक्षच मिळालेला नाही. दरम्यान, प्रशासकीय राजवट असलेले प्राधिकरण आता पीएमआरडीए त विलीन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत."

 

संबंधित लेख