इंदिराजींच्या 'त्या' शब्दांनी आयुष्य बदलले : विलास मुत्तेमवारांनी उलगडला जीवनप्रवास

''नागपूर में लाठी खाने वाले युवक को चिमूर की उम्मीदवारी दे दो,'' इंदिरा गांधी यांच्या या शब्दांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचे आयुष्यच बदलले. 1975 मध्ये नागपूर महापालिकेची निवडणूक हरणारे मुत्तेमवार 1980 मध्ये खासदार म्हणून दिल्लीत गेले. पुढे जवळपास 32 वर्षे ते लोकसभेत होते. त्यांनी आपल्याच शब्दात आपला जीवनप्रवास उलगडला.
इंदिराजींच्या 'त्या' शब्दांनी आयुष्य बदलले : विलास मुत्तेमवारांनी उलगडला जीवनप्रवास

मी मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातला. नोकरी करण्यासाठी मी नागपुरात आलो. मजुरीचे काम केले. थोडेफार लिहिता येत होते, म्हणून एका दैनिकात पत्रकार झालो. परंतु, त्यात फार रमलो नाही. माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी यांच्या विचाराचा पगडा होता. त्यामुळे माझ्यावरही त्याच विचाराचे संस्कार झाल्याने काँग्रेसशी जोडलो गेलो. 1971 च्या बांगलादेश युद्धाच्या विजयामुळे इंदिरा गांधी देशातील 'आयकॉन' झाल्या होत्या. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा माझ्याही जीवनावर प्रभाव पडला. 1975 मध्ये नागपूर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविली व पराभूत झालो. पण उमेद हरलो नाही.

याच काळात इंदिरा गांधी यांना अडचणीत आणण्यासाठी देशातील काही नेते एकत्र आले होते. आणिबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव झाला. जनता सरकार सत्तेवर आले. इंदिरा गांधींना विविध आरोपात अडकवून त्यांचा छळ सुरू झाला. या विरोधात जनमत संतप्त होऊ लागले. 1979 मध्ये आचार्य विनोबा भावे यांची भेट घेण्यासाठी इंदिरा गांधी पवनारला जाणार होत्या. नागपूर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. परंतु, पोलिसांनी विमानतळावर संचारबंदी लागू केली. सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात तरुण कार्यकर्ते एकत्र आले. यात माझाही समावेश होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोध मोडून विमानतळावर गर्दी केली. आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे पोलिसांनी लाठीमार सुरू केला. माझ्या डोक्‍यावर लाठीचा प्रहार झाला आणि मी बेशुद्ध झालो. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले.

पोलिसांच्या लाठीमाराची माहिती इंदिरा गांधींना देण्यात आली. नागपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून देशातील तरुणांचा कल कुणाकडे आहे, याची जाणीव इंदिरा गांधींना झाली. विनोबा भावे यांनीही 'चालत रहा' असा सल्ला त्यांना दिला. पवनारहून नागपुरात आल्यानंतर इंदिरा गांधींनी लाठीमारात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. सर्वांची आस्थेने विचारपूस केली.

जनता सरकारमध्ये लाथाळ्या सुरू झाल्या. केंद्र सरकार गडगडले. 1980 मध्ये पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या. काँग्रेसचा मी साधा कार्यकर्ता होतो. खासदार होण्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक सुरू झाली. चिमूरची उमेदवारी कुणाला द्यायची? असा प्रश्‍न समोर आला. मी सुद्धा मुलाखत दिली. 'नागपूर में लाठी खानेवाले युवक को उम्मीदवारी दे दो' असे म्हणत इंदिरा गांधी माझी आठवण ठेवली. सर्वच स्वप्नवत झाले होते. निवडणूक झाली व निवडून आलो. पाच वर्षांपूर्वी महापालिकेची निवडणूक पराभूत झालेला विलास मुत्तेमवार खासदार झाला. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची किंमत करणाऱ्या इंदिरा गांधीसारख्या नेत्यांसोबत काम करायला मिळाले, हे माझे भाग्य. आज मी जे काही आहे. त्यासाठी इंदिरा गांधी यांचे नेतृत्व कारणीभूत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com