vilas muttemwar and nagpur | Sarkarnama

उमेदवारीच्या मुद्यावर मुत्तेमवारांचे समर्थक दोन पावले मागे ?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या उमेदवारीवरून असणारा आग्रह आता कमी झाला आहे. त्यांच्या समर्थकांनी दोन पावले मागे जाणे पसंत केले आहे. मुत्तेमवार नसतील तर विकास ठाकरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मुंबईत कॉंग्रेस पक्षाने आढावा बैठका सुरू केल्या आहेत. आज विदर्भातील उमेदवारांचा आढावा घेण्यात आला. यात नागपूरची उमेदवारी केंद्रस्थानी होती. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रा. स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये "तगडा' उमेदवार दिला पाहिजे, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. गेल्या निवडणुकीत पावणेतीन लाख मताधिक्‍यांनी पराभूत झालेले विलास मुत्तेमवार पुन्हा बाशिंग बांधून तयार आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतंत्रपणे निरीक्षक पाठवून प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी यापूर्वीच केली आहे. या निरीक्षकांनी मुत्तेमवार यांच्या उमेदवारीची फार अग्रक्रमाने शिफारस केलेली असल्याचे समजते. निरीक्षकांच्या अहवालानुसार नागपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, प्राचार्य बबनराव तायवाडे यांच्या नावांची शिफारस केलेली असल्याचे समजते. 

आजच्या बैठकीत विकास ठाकरे यांनी विलास मुत्तेमवार यांच्या नावाची री ओढली. मुंबईत गेलेल्या इतरांनीही मुत्तेमवार यांच्यासाठी आग्रह धरला परंतु पक्षश्रेष्ठी मुत्तेमवारांच्या नावावर फारशी इच्छुक नसल्याचे पाहून विकास ठाकरे यांचे नाव समोर करण्यात आले. प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या नावाला मुत्तेमवार-ठाकरे गटाचा तीव्र विरोध आहे. गुडधे पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास नागपूर शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी घराबाहेर पडणार नाही, अशी भीती आहे. 

नागपुरातील या गटबाजीत कोणत्याही गटाशी न जुळलेले व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विश्‍वासातील प्राचार्य बबनराव तायवाडे यांनाच लॉटरी लागण्याची शक्‍यता आहे. यावेळी तायवाडे यांनी नागपुरात ओबीसी, दलित व मुस्लिम समाजाच्या मतदारांच्या प्रभावाचे गणित प्रदेशाध्यक्षांना समजावून सांगितले. या आजच्या घडामोडीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या उमदेवारीवरून त्यांचे समर्थक दोन पावले मागे हटल्याचे मानले जात आहे. 
 
संबंधित लेख