vikram dhone story | Sarkarnama

जतच्या चळवळ्या विक्रमने टीचभर बांधातला हातभर भ्रष्टाचार खणून काढला! 

संपत मोरे 
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

सांगली जिल्ह्याच्या एका टोकाला जिल्ह्याच्या ठिकाणापासून दूर असलेला हा तालुका. जिल्हास्तरावरचे अधिकारी शक्‍यतो जतला फारसे फिरकत नाहीत याचाच गैरफायदा तालुक्‍यातील अधिकारी आणि गावपुढारी घेत असल्याचे ढोणे यांचे म्हणणे आहे. तालुक्‍यातील एका गावातील प्रकरण आम्ही उघडकीला आणलं आहे पण अशी शेकडो प्रकरणं आणि लाखोंचा भ्रष्टाचार अजूनही उघडकीला येऊ शकतो, असं ते सांगतात. 

"एका हॉटेलात दोन अधिकाऱ्यांची भांडणं लागलेली. त्या अधिकाऱ्यांच्या भांडणाचं कारण होतं टक्केवारी. भांडणाच्या आधारे मी शोधत गेलो तर एका घोटाळ्याचा शोध लागला. काम प्रत्यक्षात झालेच नव्हते पण कागदावर काम दाखवून पैसे काढले गेले होते. अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवले होते. हा मोठा घोटाळा होता. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात लढतोय, आता यश मिळालं', अशी प्रतिक्रिया सांगली जिल्ह्यातील जतचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी दिली. 

जत तालुक्‍यातील निगडी खुर्द गावातील जलसंधारणात झालेला भ्रष्टाचार ढोणे यांनी उघडकीला आणला होता.भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी जिल्हास्तरापासून ते आयुक्तांपर्यंत दाद मागितली होती. मात्र जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता पण ढोणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चिवटपणे संघर्ष करत लढाई दिली. अगदी पुण्यात जाऊन ठिय्या मारला. शेवटी संबधीत अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत फौजदारी करण्याचे आदेश कृषी आयुक्तलयाकडून देण्यात आले. त्यामुळे त्यावेळेचे कृषी अधिकारी बी डी लांडगे, कृषी मंडल अधिकारी एन एन खुडे आणि कृषी सहाय्य्क एस एन राठोड यांच्यावर कारवाईचे आदेश झाले आहेत. केवळ कागदावर काम करून स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून सरकारची दिशाभूल करणाऱ्या तिघांवर कारवाई झाली आहे. 

विक्रम ढोणे ज्या तालुक्‍यात राहतात तो जत तालुका कायम दुष्काळाच्या छायेत असतो. ढोणे हा चळवळ्या स्वभावाचा तरुण. अठरा वर्षाचा झाल्यावर चळवळीत दाखल झाला. महादेव जानकर यांच्या यशवंत सेनेत काम करू लागला. त्यांच्या विचारांच्या प्रभावासोबत क्रांतिवीर नागनाथअण्णा यांच्याबद्दल त्यांना खूपच आदर. यातूनच त्यांच्यातील लढाऊ कार्यकर्ता घडत गेला. याच कार्यकर्त्याने दिलेल्या लढतीची ही गोष्ट आहे . 

ढोणे यांनी निगडी गावात कागदोपत्रीच काम झाल्याची तक्रार केल्यावर लगेच जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यांनी खूप पाठपुरावा केला मग जिल्ह्याचे अधिकारी चौकशीला आले तेव्हा त्यांना तालुक्‍यातील एक नेते "साहेब, टीचभर बांध बघायला का आलाय? असं म्हणत झालेल्या प्रकारचे समर्थन केले. म्हणजे हा प्रकार राजकारणी मंडळींना किरकोळ वाटत होता त्याच वेळी विक्रम ढोणे आणि त्यांचे सहकारी यांना मात्र जयवंत सावळजकर यांच्या तमाशाच्या वगात चोरीला गेलेल्या विहिरीच्या गोष्टीची आठवण होत होती आणि ते कारवाईची मागणी करत पदरमोड करून सांगली येथील अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवत होते. 

सुरुवातीच्या काळात या प्रकरणाच्या बातम्या आल्या नंतर मात्र बातम्या यायच्या बंद झाल्या. "एवढं तानायचं नसतं'असेही सल्ले मिळू लागले पण ही पोरं गप्प बसणारी नव्हती. सोशल मिडीयावरून त्यांनी लढाई सुरू ठेवली. या प्रकरणाबाबतचे अपडेट समाज माध्यमातून देऊ लागले. याच दरम्यान या पोरांचा धीर खचवण्यासाठी एक निनावी बातमी आली पण कर नाही त्याला डर कसला? या बातमीनंतर तर कामाला जोर आला. या पोरांनी ओळखलं आता दोर कापलाय. एकाकीपणे हि पोरं लढत राहिली. या लढाई दरम्यान अनेक गोष्टी झाल्या, चांगले वाईट अनुभव आले, पण या अनुभवांना पाठीशी घालत त्यांनी पाठपुरावा केला. याचंच फलित म्हणून शेवटी या घोटाळ्यातील दोषींच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. 
 

संबंधित लेख