धनगर समाज 29 जुलैला 'विश्वासघात दिवस' पाळणार

जी धनगर समाजाची मागणीच नाही, त्या गोष्टी फडणवीस सरकारकडून केल्या जात आहेत आणि आता जाहीर केलेल्या 1 हजार कोटीतील 100 कोटी तरी समाजाला मिळतील कां, ही शंकाच आहे. कारण हा निधी कसा आणि कुठे खर्च केला जाणार, हे अस्पष्ट आहे.
धनगर समाज 29 जुलैला 'विश्वासघात दिवस' पाळणार

पुणे : धनगर एस टी आरक्षणप्रश्नी देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या फसवणुकीबद्दल 29 जुलैला 'विश्वासघात दिवस' पाळण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ढोणे म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात धनगर एसटी आरक्षणाचे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचा केंद्रबिंदू पुणे जिल्ह्यातील 'बारामती' होता. 15 जुलै 2014 रोजी पंढरपूर ते बारामती या आरक्षण पदयात्रेला सुरवात झाली. 21 जुलैला ही यात्रा बारामतीत पोहचली आणि आमरण उपोषणाला सुरू झाले. 29 जुलैला हे उपोषण सोडवण्यासाठी भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस बारामतीला आले. यावेळी भाषण करत असताना फडणवीस यांनी आपण सर्व अभ्यास करून आलोय आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देवू, असे जाहीर केले. त्यांच्या आवाहनानुसार उपोषण सोडण्यात आले. लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने भारतीय जनता पक्षाला भरभरून मते दिली. भाजपला महाराष्ट्राची सत्ता मिळाली आणि स्वत: फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस दिलेला शब्द पाळतील म्हणून समाज अपेक्षेने वाट पाहत होता. मात्र फडणवीसांनी पहिल्या...दुसऱ्या... दहाव्या कॅबिनेटमध्ये कोणताच निर्णय घेतला नाही. आजवर मंत्रीमंडळाच्या 228 बैठका झाल्या तरी, आरक्षण मिळालेले नाही.

धनगर एसटी आरक्षणासाठी लोकसभेच्या अगोदर एक मंत्रीसमिती नेमण्यात आली आहे. ही समिती पाच वर्षापुर्वीच नेमायला पाहिजे होती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्य़ात, आचारसंहिता चार दिवसांवार आली असताना ही समिती नेमली गेली. लगेच झालेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत आदिवासींप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय झाला. मात्र त्यानंतर समितीची एकही बैठक झालेली नाही. आरक्षण देण्याचा मुख्य उद्देशच ही समिती विसरली आहे. त्यामुळे फडणवीस सरकार धनगर आरक्षण प्रश्नावर पुर्णपणे अपयशी ठरले आहे. मात्र हे अपयश झाकण्यासाठी फडणवीस स्वत: चे सत्कार घडवून आणत आहेत. या सर्व प्रकाराचा, झालेल्या फसवणुकीचा धनगर समाजातील सुशिक्षीत, विवेकी तरूणांना वीट आला आहे. धनगर समाजाचा हा गोड बोलून केलेला विश्वासघात आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचा निषेध करण्याची भुमिका तरूणांनी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत ज्यादिवशी धनगर समाजाला आश्वासन दिले तो 29 जुलै हा दिवस 'विश्वासघात दिवस' म्हणून पाळण्याचे ठरवले आहे, असे ढोणे म्हणाले.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com