विखे-थोरात दोघेही राष्ट्रीय कलावंत; वेळ आल्यावर एकत्र येतात : अशोक चव्हाण

पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. कुणीच समाधानी नाही. सरकारची निव्वळ फसवणूक सुरू आहे. ग्रामीण भागाची कणा असलेली सहकार चळवळ मोडीत काढण्याचे काम सध्या सुरू आहे. केवळ टोलवाटोलवी करणारे हे सरकार खाली खेचा. आता परिवर्तन अटळ आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा - अशोक चव्हाण
 विखे-थोरात दोघेही राष्ट्रीय कलावंत; वेळ आल्यावर एकत्र येतात : अशोक चव्हाण

संगमनेर (नगर) : ''नगर जिल्ह्यात विखे आणि थोरात वेळ आल्यावर एकत्र येतात. दोघेही राष्ट्रीय कलावंत आहेत. आता ते एकत्र आलेत. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमय झाल्याशिवाय राहणार नाही,'' असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केले. राज्यात फडणवीस सरकार ३१ आॅक्टोबरला कर्ज माफी करणार, असे सांगते आहे. सध्या पंचांग पाहून राज्यात कारभार सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत संगमनेर येथे झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात तसेच राज्यभरातून आलेले पदाधिकारी आणि नगर जिल्ह्यातील काँग्रेसजन उपस्थित होते.

''पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. कुणीच समाधानी नाही. सरकारची निव्वळ फसवणूक सुरू आहे. ग्रामीण भागाची कणा असलेली सहकार चळवळ मोडीत काढण्याचे काम सध्या सुरू आहे. केवळ टोलवाटोलवी करणारे हे सरकार खाली खेचा. आता परिवर्तन अटळ आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा," असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केले.

अशोक चव्हाण म्हणाले, ''शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. त्यांची घोर फसवणूक केली आहे. उत्पन्न दुप्पट करू, हमी भाव देऊ, असे सांगणाऱ्या सरकारने काहीच केले नाही. कृषी अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली आहे. युवकांना नोकरी नाही. बेरोजगारी वाढली आहे. जिझिया कर लावले जात आहेत. आर्थिक लूट चालू आहे. कायदा सुव्यवस्था तर आजिबात राहिली नाही. अशा स्थितीत जनतेसमोर काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे.''

निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा : थोरात
''राज्यात काँग्रेसची लाट येत आहे. अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. शेतकरी, व्यापारी, युवक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे," असे आवाहन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

राहुल गांधी दिल की बात करतात
पंतप्रधान मन की बात करतात, तर राहुल गांधी दिल की बात करतात. देर आये दुरुस्त आये असे सांगून माजी मंत्री नसीम खान म्हणाले, जिल्ह्यात विखे - थोरात यांचे मनोमिलन होणे गरजेचे होते. ते आता झाले आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमय करणे अवघड नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com