vikhe thorat | Sarkarnama

जिल्हा नियोजनच्या निवडणुकीत कॉंग्रेसमध्ये विखे-थोरात गट स्वतंत्र

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

नगर : जिल्हा नियोजन समितीतील 36 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी काल अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 72 अर्ज दाखल झाले. त्यामध्ये कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बाळासाहेब थोरात या दोन्ही गटांकडून स्वतंत्र अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात विखे-थोरात यांच्या लढाईला पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. 

नगर : जिल्हा नियोजन समितीतील 36 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी काल अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 72 अर्ज दाखल झाले. त्यामध्ये कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बाळासाहेब थोरात या दोन्ही गटांकडून स्वतंत्र अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात विखे-थोरात यांच्या लढाईला पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता धूसर झाली आहे. 
शिवसेना व भाजपचे सदस्य अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र आले. कॉंग्रेसच्या दोन्ही गटांतील उमेदवारांनीही स्वतंत्र अर्ज दाखल केले. डॉ. सुजय विखे यांनी कॉंग्रेसमधील गटांसाठी निश्‍चित केलेला सात-चार फॉर्म्युला आमदार बाळासाहेब थोरात गटाला पटला नाही. त्यामुळे विखे गटाने सात आणि थोरात गटाने आठ अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून सहा अर्ज आले; मात्र शिवसेना उमेदवारांसह भाजपच्या ललिता शिरसाठ यांनीही अर्ज केला. भाजपकडून 11 जणांनी अर्ज दाखल केले. 
जिल्हा परिषदेतील महिला मागास प्रवर्गासाठी पाच जागांसाठी पाचच अर्ज आले आहेत. जिल्हा परिषद अनुसूचित जाती प्रवर्गाच्या दोन जागांसाठीही दोनच अर्ज आले आहेत. जिल्हा नियोजन समितीतील रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. अर्ज दाखल करण्याची काल (शुक्रवारी) अखेरची मुदत होती. रिक्त 36 जागांसाठी 72 अर्ज आले. त्यांत जिल्हा परिषद अनुसूचित जातींसाठी चार जागा असून, त्यात दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी दोनच अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जातींच्या महिला राखीवसाठी चार अर्ज आले. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या दहापैकी पाच जागा महिलांसाठी आहेत. सर्वसाधारणसाठी दहा आणि महिला राखीवसाठी पाच अर्ज दाखल झाले. सर्वसाधारण प्रवर्गातील 17 पैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारणमधून 15 व महिला राखीवसाठी 13 अर्ज आले. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी दोन अर्ज आले. 
नगरपालिकेसाठी तीन जागा आहेत. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी पाच अर्ज आले. मागास प्रवर्गाच्या महिला राखीव एका जागेसाठी चार अर्ज आहेत. सर्वसाधारण महिला प्रवर्गात एका जागेसाठी सहा अर्ज आले. नगरपंचायतीमधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातील एका जागेसाठी सहा अर्ज आले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. 
दरम्यान, जिल्हा परिषदेत अनुसूचित जाती सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागांइतकेच अर्ज आले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गात कर्जतमधील कांतिलाल घोडके व जामखेडचे सोमीनाथ पाचारणे यांचे अर्ज आहेत. महिला राखीवमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, कविता लहारे, तेजश्री लंघे, ललिता शिरसाठ, संध्या आठरे यांचा समावेश आहे. छाननीत अर्ज बाद न ठरल्यास या निवडी निश्‍चित आहेत. 

संबंधित लेख