थोरातांना कात्रित पकडण्यासाठी विखे-पाटील कोणती चाल खेळणार ?

कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याने राज्यात कॉंग्रेसला उर्जितावस्थेत आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्याहीपेक्षा मोठे आव्हान आपल्याच मतदारसंघात (संगमनेर) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे असणार आहे.
थोरातांना कात्रित पकडण्यासाठी विखे-पाटील कोणती चाल खेळणार ?

नगर : कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याने राज्यात कॉंग्रेसला उर्जितावस्थेत आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्याहीपेक्षा मोठे आव्हान आपल्याच मतदारसंघात (संगमनेर) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे असणार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची राज्यात वाताहात करण्यासाठी थोरातांना मतदारसंघात बांधून ठेवणे किंवा मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी विखे-पाटील प्रयत्नांची पराकाष्टा करतील. साहजिकच थोरातांना राज्यभरात कॉंग्रेसच्या जागा वाढविण्याबरोबरच आपली आमदारकी टिकवून ठेवण्यात मोठी ताकद लावावी लागणार आहे. थोरातांना कात्रीत पकडण्याची कोणतीच संधी विखे-पाटील सोडणार नाही, हे निश्चित आहे.

शालिनी विखेंना उमेदवारी ?
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भक्कम उमेदवार देण्यासाठी विखे पाटील प्रयत्न करतील. त्याचाच एक भाग म्हणून विखे पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांना संगमनेरमधून भाजपची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अद्याप तशा हालचाली दिसून येत नसल्या, तरी थोरातांना मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठी व गेल्या सात वर्षांची आमदारकी हिसकावून घेण्यासाठी अशी खेळी विखेंना लाभदायक ठरू शकते. कारण संगमनेरमध्ये थोरातांना तोंड देईल, असा इतर पक्षातील कोणत्याही नेत्याने अद्यापतरी डोके वर काढलेले नाही.

कार्यकर्त्यांवरच भिस्त
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला राज्यभरात जागा मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव व त्यांनी दिलेला राजीनामा यामुळे कॉंग्रेस नेत्यांचे खच्चीकरण झाले आहे. त्यांना उर्जितावस्थेत आणण्याची मोठी जबाबदारी थोरातांना पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे संगमनेर मतदारसंघाची भिस्त प्रमुख कार्यकर्त्यांवर राहणार आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक जिंकणे थोरात यांच्यासाठी खूपच अवघड राहणार आहे. त्यामुळे आपलाही `राहुल गांधी` होऊ नये, यासाठी थोरातांना काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत.

लोकसभेच्या आकडेवारीचा धोका
लोकसभेच्या निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बहुतेक ठिकाणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनाच मताधिक्य आहे. विखे पाटील यांनी लोखंडे यांना दिलेला पाठिंबा त्याला कारणीभूत ठरले. कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे हे थोरात यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मात्र थोरातांच्या बालेकिल्ल्यातून कमी मते मिळाली, ही धोक्याची घंटा थोरात यांच्यासाठीही आहे. त्यामुळे या आकडेवारीचा अभ्यास थोरातांना खूप काही सांगून जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com